निमगाव केतकी येथील भुयारी मार्गाचे काम चुकीचे

निमगाव केतकी येथील भुयारी मार्गाचे काम चुकीचे

Published on

निमगाव केतकी, ता. ७ : निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या बाह्यवळणातील निमगाव केतकी- शेळगाव रस्त्याच्या भुयारी मार्गाचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. यावर तोडगा निघेपर्यंत हे काम बंद ठेवण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला द्यावेत, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे प्रकल्प अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भुयारी मार्गाच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी मंगळवारी (ता. ७) सकाळी संदीप भोंग, मच्छिंद्र आदलिंग, ॲड. सचिन राऊत, ॲड. श्रीकांत करे, मनोज भोंग, धनाजी आदलिंग, भारत आदलिंग, सागर जगताप, पोपट भोंग, विशाल भोंग, नाना आदलिंग, विजय भोंग यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी हे काम चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचे ठेकेदार व अधिकाऱ्यांना सांगितले.
यावेळी ग्रामस्थ म्हणाले, निमगाव केतकी- शेळगाव या रस्त्याचा भुयारी मार्ग हा सरळ असणे गरजेचे असताना तो तिरका केला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहन चालकांना सतत अपघाताला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आम्ही प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन पाठवले आहे. येथील प्रश्नावर तोडगा निघेपर्यंत काम बंद ठेवावे, अशी मागणी केली आहे. तोडगा न काढल्यास आम्ही आंदोलन उभारू, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

02958

Marathi News Esakal
www.esakal.com