इंदपूरची कडबनवाडी जगाच्या नकाशावर

इंदपूरची कडबनवाडी जगाच्या नकाशावर

Published on

मनोहर चांदणे, निमगाव केतकी (ता. इंदापूर)

कडबनवाडी (ता. इंदापूर) येथे दोन वर्षांपूर्वी पुणे वन विभागाने सुरू केलेल्या ‘ग्रासलँड सफारी’ (गवत कुरण सफारी)ची देशी व परदेशी पर्यटकांना भुरळ असून आतापर्यंत सुमारे वीस हजार पर्यटकांनी येथे भेटी दिल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर अद्याप ही या गावा पर्यंत एसटी न पोहोचलेल्या दुर्लक्षित अशा कडबनवाडीची ओळख आता पर्यटनाच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर पोहोचली आहे.
खुरट्या, गवताळ वनातील वनश्री व वन्यजीवन दाखविण्यासाठी व या भागातील जैवविविधतेचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्याचे संवर्धन करण्यासाठी २१ऑक्टोबर २०२३ मध्ये पुणे वन विभागाने पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील पहिला असा गवताळ सफारी प्रकल्प येथे सुरू केला.
अल्पावधीत ऑनलाइन बुकिंगाच्या माध्यमातून देशी विदेशी पर्यटकांच्या येथे सहा हजार वनसफर झाल्या असून सुमारे २७ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. २० हजार पर्यटकांनी भेट झाली असून ५०० विदेशी पर्यटकांमध्ये अमेरिका, रशिया, हाँगकाँग, जर्मनी, इटली येथील पर्यटकांचा समावेश आहे.
स्थानिकांचा समावेश असलेल्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीला यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांनाही उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला आहे. सफारीचा मार्ग ३० किलोमीटरचा असून वेळ सकाळी ६ ते १२ व सायंकाळी ३ ते ६ अशी ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये चालक, जिप्सीमालक, गार्ड, स्थानिक नागरिक यांना यातून रोजगार उपलब्ध झाला आहे. स्थानिक जिप्सी चालक माणिक गावडे, नंदकुमार गावडे, राजेंद्र गावडे व गाइड म्हणून राजू पवार, विलास गावडे, सुयोग गावडे, महावीर गावडे, गणेश गावडे, अजित गावडे काम करत आहेत.
निसर्ग लेखक सुरेशचंद्र वारघडे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन तहसीलदार संजय पवार, निसर्गप्रेमी भजनदास पवार, फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबचे ॲड. सचिन राऊत, मनोहर चांदणे, जावेद मुलाणी, राहुल लोणकर, ॲड.श्रीकांत करे, वैभव जाधव, अर्जुन जाधव यांनी कडबनवाडी येथे चिंकारा लोकअभयवनची स्थापना केली. तेव्हापासून सातत्याने नेचर क्लबच्या माध्यमातून येथील पशुपक्षी व वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी वन विभागाबरोबर सातत्याने काम करत आहे. कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे हे वनराज्यमंत्री असताना तसेच तत्कालीन वनविभागाचे मुख्य प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, तत्कालीन मुख्य प्रधान वन सचिव विकास खर्गे, पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन यांनी येथील वन्यप्राण्यांची साठी निधी उपलब्ध करून दिल्याने या ठिकाणी नैसर्गिक पाणवठे, सौरपंप, स्वागत कमान, मनोरे, पायवाटा अशा विविध सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. कडबनवाडी जगाच्या नकाशावर पोहोचवण्यामध्ये पुण्याचे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक महादेव मोहिते , साहाय्यक वनसंरक्षक मंगेश ताटे , इंदापूरच्या वनक्षेत्रपाल भाग्यश्री ठाकूर तसेच तत्कालीन मुख्य वनसंरक्षक जीतसिंह, इंदापूरचे तत्कालीन वनक्षेत्रपाल बी.जे. घाडगे, तत्कालीन वनक्षेत्रपाल एस.एस.सातपुते तत्कालीन वनक्षेत्रपाल राहुल काळे तत्कालीन वनक्षेत्रपाल अजित सूर्यवंशी यांचा पाठपुरावा महत्त्वाचा आहे.

सुमारे ३५०० हेक्टर क्षेत्रावर...
सुमारे ३५०० हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या वनक्षेत्रात उघड्या जिप्सीमधून चिंकारांचा कळप, तरस, ससा, कोल्हा, लांडगे, खोकड असे १५ पेक्षा अधिक प्राणी व नराच गरुड, सर्पमार गरुड, धाविक, मळटिटवी, चंडोल शृंगी घुबड अशा १०० पेक्षा अधिक स्थानिक प्रजातीचे पक्षी व हिवाळ्यात युरोप व रशियामधून येणारे आखूड कानाचा गरुड, ससाणा अशा पक्षांच्या दर्शनाने पर्यटक आनंदित होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com