पोलिस असल्याची बतावणी; ज्येष्ठाचे दागिने केले लंपास
खेड शिवापूर, ता. २६ : ससेवाडी (ता.भोर) येथे एका अनोळखी व्यक्तीने पोलिस असल्याची बतावणी करून पुढे तपासणी सुरू असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाचे सुमारे साडेपाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी राजगड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बाळासाहेब ज्ञानोबा धुमाळ (वय ६५, रा. उत्तमनगर, पुणे) यांनी राजगड पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली. धुमाळ हे मंगळवारी (ता.२४) रोजी ससेवाडी गावातील कच्च्या रोडच्या कडेला दुचाकी उभी करून थांबले होते. यावेळी पाठीमागून एक अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून त्यांच्याजवळ आला. त्याने धुमाळ यांना पोलिस असल्याचे सांगितले. तसेच पुढे तपासणी सुरू आहे. तुमचे दागिने कापडात बांधून खिशामध्ये ठेवा, असे सांगून धुमाळ यांचा विश्वास संपादन केला. धुमाळ यांनी त्यांच्याकडील सोन्याची साखळी आणि सोन्याची अंगठी कापडात बांधण्यासाठी त्या अनोळखी व्यक्तीच्या ताब्यात दिली. त्याने दागिने कापडात आहे असे भासवून स्वतः कडे ठेवले. धुमाळ यांचे सुमारे साडेपाच लाखांचे दागिने घेऊन तो पसार झाला. राजगड पोलिस पुढील तपास करत आहेत.

