पायाभूत सुविधांसाठी कृतिशील कार्यक्रम राबविणार

पायाभूत सुविधांसाठी कृतिशील कार्यक्रम राबविणार
Published on

कोळवण, ता. ३ : आमदारकीची निवडणूक जिंकल्यानंतर भोर, राजगड तालुक्यांतील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी आणणार आहे. तसेच मुळशीतील वाहतूक कोंडी, रस्ते रुंदीकरण, आरोग्य सुविधा, शिक्षण या पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी कृतिशील कार्यक्रम राबविणार असल्याचे प्रतिपादन भोर-वेल्हा-मुळशीचे नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर यांनी केले.
कोळवण खोऱ्यातील नागरिक व जनकल्याण फाउंडेशनच्या वतीने भोर-वेल्हा-मुळशीचे नवनियुक्त आमदार शंकर मांडेकर यांचा सोमवारी (ता. ३) नांदगाव येथील माउली मंगल कार्यालयात नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार मांडेकर यांनी मतदारसंघाच्या विकासाचे व्हीजन मांडले. कार्यक्रमाआधी संग्राम भंडारे पाटील यांचे कीर्तन झाले. यानंतर दशरथ महाराज मानकर, माजी सभापती रवींद्र कंधारे, पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक बाबूराव चांदेरे, नामदेव टेमघरे, रासपचे तालुकाप्रमुख भाऊ आखाडे, शांताराम इंगवले यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर उपस्थित मान्यवरांकडून नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर यांचा मानाची पगडी, तुळशीचा हार, शाल, श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनारूढ प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी तालुक्यातील राजकीय पक्षांतील प्रमुख पदाधिकारी, वारकरी, युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मांडेकर म्हणाले, ‘‘अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आनंदच आहे. कार्यकर्ता म्हणून ही माझी भावना आहे. मेट्रो आल्यामुळे हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटणार आहे. मतदारसंघात असणाऱ्या निसर्गसंपदेमुळे पर्यटन क्षेत्र, व्यवसाय व रोजगारवाढीला चालना देणार आहे. शेतीशी संबंधित प्रश्‍न, शेतमाल हमीभाव याबाबतचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सरकारकडे सतत पाठपुरावा करणार आहे. वारकरी संप्रदायाने मागणी केल्यास त्यांना सर्वतोपरी मदत करणार. चांदणी चौक ते ताम्हिणी घाट रस्त्याचे रखडलेले काम अंदाजपत्रकानुसार संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून करून घेण्यास प्राधान्य देणार आहे.’’

मागील पंधरा वर्षांपासून जनकल्याण युवा फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत आहे. कोरोना काळात १२ हजार ५०० गरजूंना अन्नधान्याचे किटचे वाटप केले. महिलांसाठी मोफत कर्करोग आरोग्य शिबिरे आयोजित केली. त्यामुळे खासदार सुनेत्रा पवार यांनी ‘आरोग्य दूत’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. आदिवासी कातकरी वस्तीवरील शालेय मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप केले. यापुढील काळातही फाउंडेशनकडून ही कामे सुरू राहतील.
- संतोष पेरणेकर, संस्थापक, जनकल्याण युवा फाउंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com