चाले पुलाशेजारी धोकादायक खड्डा
कोळवण, ता. २९ ः पौड- कोळवण रस्त्यावर चाले (ता. मुळशी) येथील पुलाच्या शेजारी मोठा खड्डा पडला असून, या खड्ड्यामुळे येथून चारचाकी व दुचाकी चालवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
पौडकडून आले की चाले पुलाच्या थोडे अलीकडे मोठा खड्डा पडला आहे. यामुळे येथील खड्डा दिवसा व रात्रीच्या वेळी वाहने चालवताना लक्षात येत नाही. त्यामुळे या खड्ड्यात वाहने आदळल्याने नुकसान होत आहे. दुचाकी चालवताना तोल जाऊन दुचाकीस्वार खड्ड्यात पडत आहे. सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. त्यामुळे उत्सवाअगोदर बांधकाम विभागाकडून या रस्त्यावर असणारे खड्डे बुजवून घेणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही.
पावसाळा जोरात सुरू असल्यामुळे खड्डे बुजविता येणार नाहीत असे बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, हे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात खडी व मुरूम टाकून भरता येऊ शकतात. मात्र, बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
पौड- कोळवण- काशिग रस्त्यावर विविध ठिकाणी खड्डे पडले आहेत. मात्र, बांधकाम विभागाकडून खड्डे भरले गेले नाहीत. यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास होत आहे. राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी यावर आवाज उठवून अधिकाऱ्यांना जाब विचारायला हवा होता. मात्र, ते सुद्धा गप्प आहेत, तसेच मुळशी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील उपकार्यकारी अभियंता हे मागील तीन महिन्यांपासून प्रभारी आहेत. तालुक्याला कायमस्वरूपी उपकार्यकारी अभियंता हवा, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
02389