कोळवण खोऱ्यात विजेचा लपंडाव सुरु; नागरिकांना मनस्ताप तर विद्यार्थ्यांचा अभ्यास अंधारात
कोळवण, ता. १५ ः कोळवण खोऱ्यातील विजेच्या लपंडावामुळे येथील ग्रामस्थ व विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. मागील तीन ते चार दिवसांपासून या भागातील वीजपुरवठा सतत खंडित होत आहे.
येथील परिसरात सोमवारी (ता. १३) काशिग (ता. मुळशी) येथे वीजेचा खांब पडला होता. तेव्हा रात्रभर वीज गेली, तर बुधवारी (ता. १५) पहाटेच वीज गेली, ती सकाळी साडे सात नंतरच आली. हे असे मागील चार पाच दिवस सुरू आहे. वीज गेल्याने गावातील मंदिरांमधील काकड आरती, भजन अंधारातच पार पडले.
महावितरणमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना समस्या सांगण्यासाठी फोन केला तर ते वेळेवर फोन उचलत नाहीत. मग बिघाड कुठे झाला व तो कोणाला सांगावा आणि तो कसा दुरुस्त होणार, परस्परांत संपर्क साधला गेला नाही, तर वीजपुरवठा सुरळीत चालू कसा होणार? दरवेळी तालुका उपअभियंता यांना फोन करायचा का? असे प्रश्न येथील ग्रामस्थांनी उपस्थित केले. महावितरण येथील वीज बिघाड दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न करत असेल, तर त्यांनी तशी अगोदर सूचना द्यायला हवी. बिघाड कुठे होतो, तो शोधायला हवा व यावर कायम स्वरूपी उपाययोजाना करावी, असं काही घडताना दिसत नाही
सध्या सण- उत्सवांचे दिवस आहेत. दिवाळी काही दिवसांवर आली आहे. या सर्व बाबींचा विचार महावितरणने करायला हवा व या भागातील वीजपुरवठा सुरळीत कसा राहील, याकडे लक्ष द्यायला हवे. मुलांच्या सहामाही परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सकाळी लवकर उठावे लागते. तसेच, रात्री उशिरापर्यंत अभ्यास करावा लागतो. वीज गेली तर त्यांना अंधारातच मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करावा लागते. याचाही गांभीर्यपूर्वक विचार महावितरणने करावा, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सोमवारी रात्री उशिरा काशिग येथे वीजेचा खांब पडला होता. या ठिकाणी दुरुस्ती करण्यासाठी वीज पुरवठा बंद केला होता, तर इतर ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत चालू केला. वारंवार येणाऱ्या वीज समस्या सोडविण्यासाठी आमचे पथक रात्रंदिवस काम करत आहे. भविष्यात वीज समस्या आली, तर ती तत्काळ सोडविण्यासाठीच्या सूचनाही कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
- आनंद घुले, उपअभियंता, महावितरण, मुळशी
कोळवण खोऱ्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. केव्हाही वीज जाते. कर्मचारी फोन उचलत नाहीत. मग आम्ही समस्या सोडविण्यासाठी कोणाला सांगावे. दिवाळी काही दिवसांवर आली आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत, ते अंधारात अभ्यास करतात. तसेच, गावोगावी काकड आरतीचे भजनही अंधारातच पार पडते.
- समीर दुडे, ग्रामस्थ, कोळवण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.