पावसामुळे भात काढणी रखडली
कोळवण, ता. ३ ः नोव्हेंबर महिना आला तरी पाऊस उघडायचे नाव घेईना. यामुळे काढणीस आलेल्या भाताची कापणी सुरू होऊ शकली नाही. साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भात काढणीस येतो. मात्र, यावर्षी भात काढणीसाठी शेतकरी पाऊस उघडायची वाट पाहत आहेत.
भात कापणीसाठी अगोदरच १५ दिवस उशीर झाला आहे. त्यामुळे लोंब्या तुटून खाली पडत आहेत. तसेच, पाऊस असल्याने भात हे पेंढ्यासह काळे पडला आहे. काही ठिकाणी भात पीक आडवे पडले असून, दाण्यांवर, पेंढ्यावर चिखल व पाणी साचले आहे. यामुळे हा पेंढा जनावरे खाणार नाहीत. तसेच, दमट हवामान व वातावरण बदलामुळे भात पिकावर करपा, पांढरी बुरशी, तसेच इतर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. भात पीक कापणी करताना पांढरी बुरशी नाका- तोंडात जाते. त्यामुळे विविध आजार होण्याची शक्यता आहे.
यावर्षी जून महिन्यात पाऊस असल्याने भात रोपांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे रोपांचा तुटवडा निर्माण झाला होता. याचा परिणाम कमी क्षेत्रात लागवड करावी लागली. आता भात पीक कापणीसाठी आले, तर पाऊस थांबत नाही. यामुळे उशिरा कापणी सुरू होणार आहे. लोंब्यांमधील दाणे जमिनीवर ढासळत आहेत. करपा व इतर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे उच्च प्रतीच्या तांदळाचे उत्पादन घटणार आहे.
नुकसान भरपाई देण्याची मागणी
भात पिकासाठी पंतप्रधान पीक विमा योजना आहे. मात्र, एक रुपयात पीक विमा योजना बंद झाल्याने त्यामध्ये तालुक्यातील कमी लोकांनी सहभाग घेतला आहे. तसेच, काढणीपश्चात नुकसान भरपाईची तरतूद यावर्षीपासून असल्याने येथे सुद्धा अडचणी येणार आहेत. शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
भात पिकांचे १ नोव्हेंबर रोजी पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे भात पिकांचे पंचनामे सुरू होतील. पंचनामे करून तसा अहवाल त्वरित पुढील कार्यवाहीसाठी पाठवणार आहे.
- विजयकुमार चोबे, तहसीलदार, मुळशी
जून महिन्यात शासनाने पंचनामे केले त्याची अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. आम्ही यासाठी राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांना भेटलो, तरीही कार्यवाही झाली नाही. आता भात काढणीस आला असताना पाऊस पडत आहे. याचे पंचनामे होतील परंतु, नुकसान भरपाई कधी मिळणार?
- किसन फाले, शेतकरी, नांदगाव
02633
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

