कोळवण खोरे पर्यटनाला निसर्ग सौंदर्याचा साज

कोळवण खोरे पर्यटनाला निसर्ग सौंदर्याचा साज

Published on

पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरण... चोहीकडे सह्याद्रीच्या हिरवी मखमली चादर पांघरलेल्या डोंगर रांगा... निसर्गाने केलेली हिरवाईची मुक्त उधळण... पावसाळ्यातील बहरलेली भातशेती... पुरातन मंदिरे... अन् शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तिकोना किल्ला... पवना धरण अन् हाडशी तलाव... निसर्ग देवतेची कृपा लाभलेले काशिग हे टुमदार गाव. निसर्गाने सौंदर्याची मुक्त उधळण केल्याने मुळशी व मावळ तालुक्याच्या सीमेवरील वसलेले हे गाव पर्यटकांसाठी टुरिझम डेस्टिनेशन बनले आहे.
-पांडुरंग साठे, कोळवण

पर्यटकांच्या स्वागतासाठी काशिग येथे सुमारे सात कृषी पर्यटन केंद्र नेहमीच सज्ज असतात. व्यवसायाच्या दृष्टीने कृषिपर्यटनाकडे गावातील तरुणांनी पाहिले. यातील संधी अचूक हेरली व हाडशी तलावास लागून असणाऱ्या स्वमालकीच्या जमिनीवर येथील तरुणांनी कृषी पर्यटन केंद्र उभारली. काहींनी डोंगराच्या सानिध्यात तर काहींनी ऐतिहासिक तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी केंद्रे सुरू केली. येथील कृषी पर्यटन केंद्रावर येण्यासाठी पर्यटकांस पुण्यापासून सुमारे ४० तर मुंबईपासून सुमारे १२५ किलोमीटर अंतर आहे. कृषीपर्यटन केंद्रांमध्ये पर्यटकांना अत्याधुनिक सोई सुविधा मिळतात. पर्यटक दिवसभर पर्यटनासाठी येऊ शकतात. काही पर्यटक हे रात्री मुक्काम करण्याचे नियोजन करून येतात. त्यांची घरच्यासारखी राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था केली जाते.

उन्हाळ्यातील पर्यटनाचे वैशिष्टय
ऐतिहासिक तिकोना किल्ला सफर, हाडशी तलावातील पाण्यात बोटिंग जवळून अनुभव, सूर्योदय, सूर्यास्त तलावातून पाहण्याचा अद्भुत अनुभव, बैलगाडी सफर, घरगुती पद्धतीचे जेवण राहण्याची उत्तम सोय, उन्हाळ्यात आंबा बागेत फेरफटका व ताजे आंबे खाण्याची संधी, थोरा मोठ्यांसाठीही मनोरंजनाचे विविध खेळ.


आध्यात्मिक पर्यटनाची अनुभूती
हाडशी येथील भूमीला साक्षात सत्यसाईबाबा यांचा पदस्पर्श झाल्याने येथे आध्यात्मिक पर्यटनासाठी येणाऱ्या भाविकांची व पर्यटकांची संख्या मोठी आहे. येथे सत्य साई पांडुरंग क्षेत्र, विठ्ठल रखुमाई मंदिर, गणपती मंदिर, सत्यसाईबाबा मंदिर आहे.
संत दर्शन म्युझियममध्ये सकल संतांच्या हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचा प्रसंग शिल्पांमधून साकारला आहे. वारीचे शिल्प, विठू माझा लेकुरवाळा ही शिल्प व अजून बाकी संतांच्या प्रतिमा जिवंत वाटतात. तसेच विविध प्रकारचे साहसी खेळ खेळण्यासाठी उत्तम व्यवस्था, प्रशस्त मैदान परिसराची शोभा आणखी वाढवते. कोळवण परिसरातील चिन्मय विभूती हे स्वामी चिन्मयानंद यांचे जीवनचरित्र सांगणारे व इतर आध्यात्मिक गोष्टींसाठी काम करणारे आध्यात्मिक केंद्र आहे. यामध्ये गणपती मंदिर, हनुमान मंदिर, स्वामी चिन्मयानंद यांचा मेणाचा पुतळा, क्रिस्टलचा पुतळा, चिन्मयानंद यांचे जीवनचरित्र सांगणारे दृकश्राव्य माध्यमातून असणारे पेंटिंग व प्रदर्शन विविध प्रकारच्या धार्मिक पुस्तकांचे ग्रंथालय, स्वानुभूती वाटिकामध्ये फेरफटका मारताना आपण स्वतःला विसरून जातो अन् आपण कोण आहोत याचा बोध नक्कीच होतो. गिरीवन या खासगी हिल स्टेशनची सफर, प्रसिद्ध ढेपेवाडा‌ येथेही भेट देता येते.

पावसाळ्यातील पर्यटन
भात लागवड माहिती व प्रात्यक्षिक
जंगल सफारीसाठी आजिवली व मोर्वे येथील देवराई
किल्ले तुंग व किल्ले लोहगड ट्रेकसाठी येथून हाकेच्या अंतरावर
दुधीवरे येथील बाबा महाराज सातारकर आश्रम जवळच
सहारा अॅम्बी व्हॅली कोराईगडासाठी येथून जवळ रस्ता.

तरुणांना रोजगारासह अर्थकारणास गती
काशिगमधील कृषी पर्यटन केंद्रामुळे गावातील तरुणांस गावातच रोजगार मिळाला आहे. त्यामध्ये किराणा, लाँड्री, हाऊसकिपींग, गावातील महिलांसाठी स्वयंपाक कामे, दररोजचा ताजा भाजीपाला पुरविणे, चिकन, मटण, मासे पुरवठा करणे आदींमुळे अर्थकारणास गती मिळाली आहे.

सेलिब्रेटींची भेट
नागराज मंजुळे, सई ताम्हनकर, आकाश ठोसर, रिंकू राजगुरू, प्रवीण तरडे, सचिन देशपांडे, सिद्धार्थ चांदेकर आदी कलाकारांनी
येथील परिसरातील पर्यटन स्थळांना भेट दिली आहे.

या सुधारणांची गरज
पौड-कोळवण-काशिग रस्ता हा कोळवण ते काशिगपर्यंत नुकत्याच एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धेमुळे मोठा व रुंद झाला आहे. वाहनांच्या अति वेगाने सारखे अपघात होतात, यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा. येथे बाराही महिने पर्यटकांची वर्दळ असते. त्यामुळे पायाभूत सुविधांवर सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे. पर्यटकांसाठी कोळवणला आरोग्य केंद्राची गरज आहे. पौड ते लोणावळा या अंतरावर फक्त पौड येथे सरकारी दवाखाना आहे. कोळवण येथे फक्त आरोग्य पथक आहे. येथे चोवीस तास ओपीडी नाही. कृषी पर्यटन केंद्रावर व हाडशी धरणावर एखादी अप्रिय घटना घडल्यास जवळच उपचाराची सोय तत्काळ असणे आवश्यक असल्याने कोळवण परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र असणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com