
शिक्रापूरच्या उपसरपंचांवर फसवणुकीचा गुन्हा
शिक्रापूर, ता. २३ : ज्या देणेदाराचे देणे आहे, त्याच्या खात्याच्या नावाने दुसरे खाते काढून थकीत रक्कम त्यात वर्ग करुन थकबाकी मिटविल्याची अजब फसवणूक येथील विद्यमान उपसरपंच विशाल खरपुडे व त्याचा भाऊ वैभव खरपुडे यांनी संगनमताने केली. याबाबत फसवणूक झालेल्या छाया गणेश मोरे यांच्या तक्रारीवरून वरील दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी माहिती दिली की, शिक्रापूरचे उपसरपंच खरपुडे यांनी जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील छाया गणेश मोरे (वय २८) यांच्याकडून काही दिवसांपूर्वी ६ लाख ४६ हजार रुपयांच्या विटा घेतल्या होत्या. त्या बदल्यात सुरवातीला मोरे यांच्या ‘रुद्र एंटरप्राइजेस या फर्मचे नावाने १ लाख ३१ हजार रुपयांचा एक धनादेश देवून तो वटविला व उर्वरित बील रक्कम देण्यासाठी सहा महिन्यांची त्यांनी मुदत मागितली. मात्र, मुदत संपल्यानंतर खरपुडे यांनी पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली व तुमचे थकीत रक्कम ‘रुद्र एंटरप्राइजेस या खात्यावर वर्ग केल्याचे सांगितले. यावर मोरे दांपत्याने खरपुडे यांचे बॅंक खाते स्टेटमेंट काढले असता ‘रुद्र एंटरप्राइजेस नावाने वेगळे खाते खरपुडे यांनीच काढले व त्या खात्यावर मोरे यांची उर्वरित रक्कम ५ लाख १५ हजारही त्या स्वत:च्या फर्मच्या खात्यावर वर्ग केल्याचे निदर्शनास आले. यावरून मोरे यांनी शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असता उपसरपंच खरपुडे व त्यांचे बंधू वैभव पांडुरंग खरपुडे या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.