
थिटेवाडी बंधाऱ्यातील मोटारींचे लवकरच सर्व्हेक्षण : महावितरण
शिक्रापूर, ता. १४ : थिटेवाडी (ता.शिरूर) बंधाऱ्यात पाच आणि तीन एचपी मोटारींची परवानगी घेऊन तब्बल ४० एचपीच्या मोटारी चालू असल्याची स्थिती असून, या सर्व मोटारींचे सर्व्हे करून मंजुरीपेक्षा जादा क्षमतेच्या मोटारींची माहिती संकलित करण्याचे काम आम्ही तत्काळ सुरू करीत असल्याची ग्वाही महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन व पाबळ शाखेचे शाखा अभियंता श्रीकांत ताटीकोंडा यांनी दिली.
थिटेवाडी बंधारा लघू पाटबंधारे खात्याकडून चासकमानच्या कोंढापुरी शाखेकडे सन २०१८ मध्ये वर्ग करण्यात आला. सन २०१८ पर्यंत उपसा व सुक्ष्मसिंचन पद्धतीने हव्या तशा परवानग्या दिल्या जात होत्या. मात्र, सन २०१८ पासून फक्त सुक्ष्मसिंचन पद्धतीने पाणी वापरणार असाल तरच परवानग्या दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमिवर सद्यःस्थितीत एकूण तीनच्यावर मोटारींना परवानगी दिली असली, तरी प्रत्यक्षात जादा क्षमतेच्या मोटारी लावून मोठ्या प्रमाणात बेकायदा पाणी उपसा सुरू आहे. या पार्श्वभूमिवर केंदूरकरांना पिण्याच्या पाण्याला नकार दिल्याने आता केंदूर ग्रामपंचायतीने बंधाऱ्यात असलेल्या सर्व मोटारींचे सर्व्हेक्षण तत्काळ करण्याचे पत्र महावितरणला दिले. त्यानुसार प्रत्येक मोटारीची मंजूर एचपी आणि त्यानुसार तिची पाहणी महावितरण करणार असून, त्याच्या अहवालानंतर पाटबंधारे विभागाला ही माहिती सादर करून पाटबंधारे खात्याच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती सरपंच सूर्यकांत थिटे व उपसरपंच विठ्ठल ताथवडे यांनी दिली.
दरम्यान, थिटेवाडी प्रकल्प हस्तांतरित करताना सन २०१८ मध्ये बंधाऱ्यातील चालू मोटारींचा लेखी अहवाल चासकमानला कळविण्यात आला आहे. त्यात केवळ ६३ विद्यूत मोटारी अधिकृत असून, १८७ मोटारी बेकायदेशीर सुरू असल्याचा स्पष्ट अहवाल दिला गेला.