केंदूरमध्ये धार्मिक वर्गण्या-देणग्या बंद

केंदूरमध्ये धार्मिक वर्गण्या-देणग्या बंद

शिक्रापूर, ता. २९ ः तिर्थक्षेत्र केंदूर (ता. शिरूर) येथील ग्रामसभेने आता पुढील दहा वर्षे सर्व धार्मिक व देवदेवतांच्या वर्गण्या बंद करण्याचा निर्णय घेतला असून आपापल्या वस्ती-वाडीतील शाळांच्या गुणात्मक सुधारणेसाठीच फक्त वर्गण्या-देणग्या संकलित करण्यास परवानगी दिली आहे. गावातील शैक्षणिक क्षेत्राची दुरवस्था दूर करण्यासाठी व गावाची स्वत:ची शैक्षणिक संस्था स्थापनेसाठीही पुढाकार घेण्याचा निर्णय ग्रामसभेने घेतला. पर्यायाने धार्मिक वर्गण्या बंद करण्याचा एकमुखी निर्णय घेणारे केंदूर हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे.
गावातील काही महत्त्वपूर्ण निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र दिनाची ग्रामसभा आज पार पडली. गावातील १०३ आदिवासी ठाकर कुटुंबांच्या घरांसाठी तसेच त्यांच्या जागेसाठी या लढ्यात उतरण्याचा एकमुखी निर्णय ग्रामसभेने घेतला. या शिवाय १० एकर जागा याच ठाकर बांधवांसाठी आरक्षित करीत असल्याचेही सरपंच सूर्यकांत थिटे यांनी जाहीर केले. गाव चौकातील गावडे परिवाराची ५ गुंठे जागा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करून ग्रामपंचायतीची ११ गुंठे जागा गावडे परिवाराला हस्तांतरित करण्याचा निर्णय ग्रामसभेने घेतला. ग्रामसभेला सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह माजी सभापती सदाशिवराव थिटे, सेझ समितीचे अध्यक्ष विलास थिटे, उद्योगपती प्रमोद पऱ्हाड, सतीश थिटे, फौजदार श्रीकांत साकोरे, माजी सरपंच सुवर्णा थिटे, भरत साकोरे, ठाकरसखा गणेश थिटे, पांडुरंग ताथवडे, तानाजी पऱ्हाड, दौलत पऱ्हाड, बाबूराव साकोरे, शिवाजी डेरे, सतीश साकोरे, भाऊसाहेब थिटे, रामभाऊ साकोरे, काळूराम पऱ्हाड, विश्वास पऱ्हाड, अशोक भोसुरे, शहाजी सुक्रे व ग्रामविकास अधिकारी एस. बी. दरेकर आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

संस्थाचालकांनी गावात येऊन बोलावे
कोल्हापूरच्या स्वामी विवेकानंद संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे यांनी केंदूरमध्ये उच्चशिक्षण संस्था स्थापनेसाठी ग्रामसभेकडे ५० एकर गायरानाची मागणी केली. यावर संस्थेने त्रोटक प्रस्ताव देवून गावाला संभ्रमित करण्यापेक्षा नेमका प्रस्ताव, उद्देश, भविष्यातील योजना, संस्थेत गावाची हिस्सेदारी, गावातील कर्मचारी नियुक्ती यांच्याबद्दल समक्ष चर्चा करावी व मगच विशेष ग्रामसभा याबाबतचा निर्णय घेईल असे ठरले.

विद्यार्थ्यांची ससेहोलपट थांबणार
१२ वाड्या-वस्त्यांचे गाव असलेल्या केंदूरमध्ये विविध देवदेवतांची ३० मोठी मंदिरे, वर्षभरात १२ हरिनाम सप्ताह आणि वेगवेगळ्या नावाने धार्मिक वर्गण्या गोळा होतात. दुसरीकडे इयत्ता दहावीनंतर गावातील सर्वच विद्यार्थ्यांची ससेहोलपट होत असल्याने ग्रामसभेने आता गावातील शैक्षणिक सुधारणेसाठी हे पाऊल उचलले आहे.

युवकाच्या किडनी प्रत्यारोपणासाठी मदत
गावातीलच काळूराम भोसुरे या युवकाच्या किडनी प्रत्यारोपणासाठी वर्गणीचा प्रस्ताव येताच सेझ समिती अध्यक्ष विलास थिटे यांनी पाच हजार रुपये पुढे ठेवून १७ ग्रामपंचायत व १७ सोसायटी सदस्यांना प्रत्येकी ५ हजारांची वर्गणीची सूचना दिली. हे मंजूर होताच उपस्थित अनेकांची पाच, दहा हजार अशा रकमांनी वर्गणी ग्रामसभेतच गोळा केल्याने आजची ग्रामसभा विशेष आदर्श ठरली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com