शिरूरमध्ये टोकाच्या संघर्ष टळला

शिरूरमध्ये टोकाच्या संघर्ष टळला

शिक्रापूर, ता.१३ : शिरूर लोकसभा मतदारसंघात चौफेर मतदानाचा उत्साह दिसून आला. निवडणूकपूर्व प्रचार काळात ज्या पद्धतीने एकमेकांवर आरोपांची राळ उडविली होती ती प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेवेळी कार्यकर्त्यांमध्ये पण उतरते का याची उत्सुकता होती. मात्र काही किरकोळ तक्रारी वगळता तसा कुठलाही टोकाच्या संघर्षाचा प्रकार संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघात दिवसभरात आढळून आला नाही.
शरद पवार यांच्यासमवेत जाणारे एकमेव आमदार म्हणजे अशोक पवार हेच होते. शिरूर-हवेलीमध्ये उर्वरित तीनही पक्षांचे पदाधिकारी मतदानासाठी तुटून पडतील आणि प्रसंगी संघर्ष होईल, अशी अटकळ बोलली जात होती. मात्र, प्रत्यक्षात तसे काहीही घडले नाही. खेड विधानसभा मतदारसंघात आमदार दिलीप मोहिते यांच्याशी जुळवून घेणे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांचे समर्थक तसेच भाजपचे पदाधिकारी यांना अवघड गेल्याने येथील मतदानाबद्दल उलट सुलट चर्चा आहे. अशाही स्थितीत या मतदारसंघात खासदार डॉ. कोल्हे यांनी मतदानाचा टक्का चांगला राहील, अशी स्थिती सकाळपासूनच बोलली जात होती ती तशीच राहीली का याचे उत्तर मात्र आता गुलदस्त्यात आहे.
जुन्नरमध्ये विधानसभा-२०२४ साठी इच्छुक असणाऱ्या विद्यमान आमदारांसह सर्वांची मोट बांधणे महायुतीला शक्य झाले असले तरी प्रत्यक्षात मतदानात डॉ. कोल्हे हे या चौघांनाही मागे टाकतील, अशी मतांची टक्केवारी असल्याचे विश्वसनीय सूत्रे सांगतात.

- आंबेगावने अनुभवली सलोख्यातील निवडणूक
- वळसे-आढळराव या दोन्ही पाटलांच्या समर्थकांच्या डोके फोडाफोडीपर्यंत चालायच्या.
- शिस्तबध्द आणि गळ्यात गळे घालून शांततेत पार पडले हे विशेष.

मतदानाच्या वेळी वातावरण नरम
भोसरी व हडपसर या दोन्ही शहरी भागांसह वाघोलीमध्ये स्थानिक सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी आपापल्या वार्डातील मतदान करवून घेण्यासाठी जेवढा प्रयत्न करायला हवा तेवढा झाला नसल्याचे चित्र होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह आढळराव-डॉ.कोल्हे यांच्या झंझावाती सभांमुळे तापलेले वातावरण प्रत्यक्षात मतदानाच्या वेळी तितकेसे गरम दिसून आले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com