

शिक्रापूर, ता. ३ : पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील सागर ऊर्फ सचिन राजेंद्र कुसेकर याच्याविरुद्ध असलेल्या अनेक गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर त्याला शिक्रापूर पोलिसांनी एक वर्षासाठी स्थानबद्ध केले. महाराष्ट्र झोपडपट्टी तथा विघातक गुन्हेगार नियंत्रण कायद्यान्वये (एमपीडीए) झालेली ही कारवाई गेल्या चार महिन्यांत दुसरी असून, अशी काही समाजघातक गुन्हेगारांची आणखीही यादी करणे सुरू असल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले.
सागर कुसेकर हा औद्योगिक परिसरात वारंवार खंडणी मागणे, गंभीर दुखापत व अपहरण करून धमकावणे, अशा स्वरूपाचे गुन्हे वारंवार करत होता. पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी अशा गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करावी, अशी सूचना केल्यावरून पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलिस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, महेश बनकर, रामदास बाबर, विकास पाटील, रोहिदास पारखे, अतुल पखाले, शिवाजी चितारे, जयराज देवकर यांचे पथक तयार करून सागर कुसेकर याच्याविरोधातील सर्व गुन्ह्यांचे एकत्रीकरण करून त्याचे विरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. या आदेशानंतर शिक्रापूर पोलिसांनी त्याला पिंपळे जगताप येथील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली. दरम्यान, २९ जून रोजी केंदूर येथील बबलू ऊर्फ अभिजित चक्रधर पऱ्हाड याला स्थानबध्द केले होते.
शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील औद्योगिक परिसर, व्यापारी बाजारपेठ आदींमध्ये वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारे, नागरिकांना त्रास देणारे, औद्योगिक ठेक्यातून वाद निर्माण करणारे, बेकायदेशीर व्यवसाय करणारे अशा अनेक गुन्हेगारांची यादी आम्ही तयार केली आहे. त्यातील काही गुन्हेगार मोका, तडीपारी व स्थानबद्धतेच्या कायद्यान्वये पकडण्याची प्रक्रीया चालू आहे.
- दिपरतन गायकवाड, पोलिस निरीक्षक, शिक्रापूर (ता. शिरूर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.