सणसवाडीत गुंगी पानाची विक्री सुरूच

सणसवाडीत गुंगी पानाची विक्री सुरूच

Published on

शिक्रापूर, ता. १२ : सणसवाडी (ता. शिरूर) परिसरात पुणे-अहिल्यानगर महामार्गालगत पान टपरीवर गुंगीकारक पदार्थ टाकून पान बनवले जात असल्याच्या टिपेवरून शिक्रापूर पोलिसांनी दोन टपऱ्यांवर छापे टाकून दोघांवर गुन्हे दाखल केले. गेल्या तीन महिन्यात सणसवाडीतील ही तिसरी कारवाई असून, या पूर्वीचे चौघे आरोपी न्यायालयीन कोठडीत जाऊनही सणसवाडीतील पानटपरीचालकांवर जरब बसत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी सांगितले की, सणसवाडी येथील समर्थ राजे पान शॉप व ओम पान शॉप या दोन पान शॉपवर नशा व गुंगीकारक पद्धतीचा मसाला टाकून पान बनवले जात आहे. गावातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या पानांच्या आहारी गेल्याची माहितीही पोलिसांना प्राप्त झाली. त्याची खातरजमा करून पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलिस हवालदार श्रीमंत होनमाने, विकास पाटील, जयराज देवकर यांचे पथक तयार करून त्यांना सणसवाडीतील समर्थ राजे पान शॉप व ओम पान शॉप या दोन्ही पान शॉपची माहिती घ्यायला सांगितले. त्यानुसार तपास पथकाने दोन्ही टपऱ्यांवर छापे टाकताच दोन्ही पान शॉपमध्ये कोणतेही नाव अथवा लेबल नसलेले प्रतिबंधित पान मसाले व रासायनिक पावडर वापरून पान बनवले जात असल्याचे निदर्शनास आले.
यावर पोलिसांनी दोन्ही पान शॉपमधील पान मसाले व पावडर जप्त करून समर्थ राजे पान शॉपचालक समर्थ हनुमंत कुकर (वय १९, रा. सराटेवस्ती, सणसवाडी) व ओम पान शॉप चालक विकास ऊर्फ सतीशकुमार जगतनारायण सिंग (वय ३६, रा. आनंदनगर, सणसवाडी) या दोघांवर मानवी जीवितास धोकादायक रसायनाची खाद्यपदार्थ विकून मानवी जीवितास धोक्यास कारणीभूत होण्याचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार व पोलिस हवालदार रविकिरण जाधव हे करत आहेत.

तरीही गाव झोपलेलेच
औद्योगिक वसाहत, कामगार व त्यांच्या कुटुंबीयांचे मोठे वास्तव्य व सुमारे साडेचार हजार विद्यार्थ्यांचा दररोज वावर असलेल्या सणसवाडीत गेल्या तीन महिन्यात वरील तिसरी कारवाई असून, तिन्ही कारवाईत टपरीचालकांवर गंभीर गुन्हे दाखल झाल्याने सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे. एवढे होत असतानाही गावातील टपरीचालक नव्याने पाने विकतात आणि गाव, गावकारभारी आणि तथाकथित पुढारी, सामाजिक कार्यकर्ते सर्वच मौन पाळून असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, सदर विषय गंभीर असून हा विषय आम्ही आता ग्रामसभेत उपस्थित करून योग्य ती ठोस कारवाई करण्यासाठीचा ग्रामसभा ठराव घेणार असल्याचे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते अशोक दरेकर यांनी सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com