जिल्ह्यात २९७ शिक्षक अतिरिक्त कार्यभाराने अध्यापनापासून दूर

जिल्ह्यात २९७ शिक्षक अतिरिक्त कार्यभाराने अध्यापनापासून दूर

Published on

शिक्रापूर, ता. २८ : पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये मुख्याध्यापकांची २१०, विस्तार अधिकाऱ्यांची १७ तर केंद्रप्रमुखांची तब्बल ७० पदे रिक्त असून या सर्व रिक्त जागांचा कारभार पदवीधर शिक्षक व उपशिक्षकांवर सोपविलेला आहे. पर्यायाने या एकूण २९७ शिक्षकांना या अतिरिक्त कार्यभाराने आपल्या नियमित अध्यापनाचे कामच करता येत नाही. या २९७ शिक्षकांमुळे सुमारे १० हजारांच्या वर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून याबाबत १० जून पर्यंत कार्यवाही करून पुणे जिल्हा परिषदेने ही सर्व पदे पदोन्नतीने न भरल्यास जिल्हाव्यापी आंदोलन तर करूच शिवाय १० हजार विद्यार्थ्यांच्या पालकांच्या रोषास आम्ही शिक्षक जबाबदार राहणार नसल्याचे लेखी पत्र महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे वतीने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना दिल्याची माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष केशवराव जाधव यांनी दिली.
पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांची सुमारे २९७ च्या वर पदे रिक्त आहेत. या सर्व रिक्त पदांचा अतिरिक्त पदभार (कार्यभार) त्या-त्या शाळेतील पदवीधर शिक्षक व उपशिक्षकांकडे देवून कारभार सुरळीत चालविल्याचा भास पुणे जिल्हा परिषद गेल्या काही महिन्यांपासून करीत आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अध्यापन व गुणवत्तेवर पर्यायाने पटसंख्येवर होत आहे. वरील सर्व पदे तत्काळ भरावीत याकरिता शिक्षक संघ गेली पाच महिने पाठपुराव्यात आहे. मात्र कार्यवाहीच होत नसल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष केशवराव जाधव यांनी १० जूनचा अल्टिमेटम देवून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मार्च २०२४ मध्ये केंद्रप्रमुख ते विस्तार अधिकारी अशी पदोन्नती केली गेली तर ऑक्टोबर २०२४ मध्ये मुख्याध्यापक ते केंद्रप्रमुख अशी काही रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यात आली. त्यानंतर पदोन्नतीची प्रक्रियाच झाली नाही. पर्यायाने मुख्याध्यापकांची २१०, विस्तार अधिकाऱ्यांची १७ तर केंद्रप्रमुखांची ७० पदे आजच्या तारखेला रिक्त आहेत. या सर्व रिक्त पदांचा कार्यभार जिल्हा परिषद प्रशासनाने थेटपणे त्या-त्या शाळेतील पदवीधर शिक्षक व उपशिक्षकांकडे सोपविल्याने या सर्व २९७ शिक्षकांवर अवलंबित सुमारे १० हजार विद्यार्थ्यांचे थेटपणे शैक्षणिक नुकसान होत आहे. वरील रिक्तपदे भरण्याबाबत पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग कसलीही तत्परता दाखवत नसल्याने जानेवारी २०२५ मध्ये सुरू केलेली पदोन्नती प्रक्रिया जून प्रारंभीही अपूर्णच आहे. जिल्ह्यातील शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी अंतिम करण्यास जिल्हा परिषद प्रशासनास तब्बल चार महिन्यांचा कालावधी लागला. त्यामुळे अनेकांना पदोन्नतीचा लाभ न मिळता ते सेवानिवृत्तही झाले. पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यात पदोन्नतीची कार्यवाही झाली असताना प्रगत पुणे जिल्ह्यातील या ढिसाळ कारभाराबद्दल शिक्षक, पालकांमध्ये तीव्र असंतोष आहे.

म्हणून १० जूनचा अल्टिमेटम
यापूर्वीही आंदोलनाचा इशारा दिल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी पदोन्नती प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याची ग्वाही दिल्याने आंदोलन स्थगित केले होते. मात्र पाटील आणि सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानंतरही कार्यवाही होत नसल्याने जिल्ह्यातील सर्वशिक्षकवृंद प्रचंड संतापलेला आहे. येत्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभास अजून १५-२० दिवस बाकी असल्याने किमान मुदत मिळावी म्हणून आम्ही आंदोलनासाठी १० जूनचा अल्टिमेटम दिल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष नारायण कांबळे, सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड व प्रदेशाध्यक्ष केशवराव जाधव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com