जिल्हा उद्योग केंद्राच्या बैठकीकडे कंपन्यांची पाठ

जिल्हा उद्योग केंद्राच्या बैठकीकडे कंपन्यांची पाठ

Published on

सणसवाडी, ता. १९ : स्थानिकांना रोजगार देण्याबाबत औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या कायदा पाळत नसल्याने त्यांच्यासमवेत बैठक करून स्थानिकांना न्याय देण्याबाबत जिल्हा उद्योग केंद्राने बोलावलेल्या कंपनी-एल्गार आंदोलक बैठकीत १८ कंपन्यांनी अनुपस्थिती दर्शविली. त्यामुळे पुढील बैठक थेट जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात घेण्याचा निर्णय जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक अर्चना कोठारी यांनी जाहीर केला.
स्थानिकांना हद्दीतील कंपन्यांमध्ये रोजगार, उद्योग, उपउद्योग तसेच कंत्राटे देण्याबाबतचा शासनाचा आदेश असताना त्याबाबतीत सणसवाडीतील ज्या २२ कंपन्यांमध्ये हा नियम पाळला जात नाही. त्यांच्यासमवेत तीन महिन्यांपूर्वी शिरूर तहसीलदार यांनी बैठक बोलाविली, त्याला कंपन्यांनी प्रतिसाद दिला नाही. प्रशासनाला दाद देत नसल्याने या प्रकरणी आवाज उठविणारे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सागर दरेकर यांनी थेट जिल्हा उद्योग केंद्राला विनंती केल्यावरून २२ मोठ्या कंपन्यांना शासकीय पत्रव्यवहाराने निमंत्रण देऊन ग्रामस्थ, प्रशासन व औद्योगिक कंपन्या अशी समन्वयाची बैठक बोलाविली होती. या बैठकीला २२ पैकी प्राज इंडस्ट्रीज, पायरोटेक इंडस्ट्रीज, फेबर आणि एसएस खर्डेकर या चारच कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याबाबत एल्गार आंदोलकांनी आक्षेप नोंदविल्यावर या बैठकीचा समन्वय ठेवणाऱ्या जिल्हा उद्योग केंद्राच्या शैला वानखेडे यांनीही संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक अर्चना कोठारी यांच्याशी फोनवर संपर्क करून दिला असता, सर्व २२ कंपन्यांसोबत एल्गार आंदोलकांची तसेच त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांच्या अनुषंगाने निर्णायक बैठक थेट पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी लवकरच आयोजित करण्याचा निर्णय झाला. याबाबत बैठकीच्या दिवशीच्या सर्व चर्चेची लेखी माहिती-अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करून निर्णायक बैठक त्यांच्या उपस्थित घेण्यासाठीचे विनंती पत्र आपण तत्काळ पाठवीत असल्याचेही शैला वानखेडे यांनी सांगितले. यावेळी अमोल दरेकर, दीपक दरेकर, केतन हरगुडे, चेतन हरगुडे, सोमनाथ दरेकर, सोमनाथ हरगुडे उपस्थित होते.

आमच्याकडे योजनेसाठी आल्यावर पाहू...
प्राज इंडस्ट्रीज, फायर्डबर्ग फिलटेशन, किंबर्ली क्लार्क, पायरोटेक, आयटीडब्ल्यू, पॉलिबाँड, जॉन डिअर, फ्युजी फिल्म, म्युच्युअल ऑटो, फेंक फेबर, ग्रोज बेकर्ट, रोकमा इंडिया, फोसिको इंडिया, ड्युरो सॉक्स, इंडिका केमिकल्स, एस. एस. खर्डेकर, शेपर्स इंडिया, क्राफ्ट्समन, हर्षओगल, कट्टीनी पॉवर, एस्सो हायड्रॉलिक, मरेली एक्झोस्ट आदी कंपन्यांना शिरूर तहसीलदार आणि जिल्हा उद्योग केंद्राकडून कळवूनही यातील प्राज, पायरोटेक, फेबर व एसएस खर्डेकर या चारच कंपन्या प्रतिसाद देत असल्याने उर्वरित कंपन्या ज्यावेळी विविध योजनांच्या निमित्ताने आमच्याकडे येतील त्यावेळी त्यांना प्रतिसाद कसा द्यायचा हे आम्ही ठरवू असेही यावेळी जिल्हा उद्योग केंद्राकडून सांगण्यात आले.

Marathi News Esakal
www.esakal.com