अजातशत्रू अजितदादा पवार...
नेतृत्व ही भूमिका सदैव राजकारणसापेक्ष असते असे नाही, तर ते सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक आणि जागतिक विषयांना स्पर्श करणारी असते. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाला अनेक अंगे आहेत, पैलू आहेत. त्यांची लोकप्रियता टिकून आहे ती त्यांच्या त्यागामुळे, विद्वत्तेमुळे, लोकमानसातील आदर आणि चारित्र्य यामुळेच. नेतृत्वाला जेवढे चाहते आणि अनुयायी असतात त्या अनुयायांच्या वृत्तीत एक प्रकारची तात्त्विक बांधिलकी असते.
- प्रकाश पवार, माजी सभापती, शिरूर बाजार समिती
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात नामदार अजितदादा पवार हे नेतृत्व आम्हा कार्यकर्त्यांचे सदैव लोकविद्यापीठ राहीले आहे. सर्वसामान्य जनतेसाठी १६ ते १८ तास उपलब्ध राहत त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आव्हान लिलया पेलणारे अजितदादा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर तळपणारी तलवारच आहे. सातत्याने गेली साडेतीन दशके अजितदादा पवार महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनावर प्रभाव टाकणारे नेतृत्व आहे. वक्तशीरपणा, पारदर्शकता आणि स्पष्टवक्तेपणा यासाठी प्रसिद्ध असलेले अजित पवार नव महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत. समाजरचनेतील शेवटच्या घटकाला समान संधी मिळावी, खेड्यापाड्यात, गावात, शहरात कृषी- औद्योगिक विकासाला गती लाभावी, महिलांच्या कौशल्याला आर्थिक प्रगतीची जोड मिळावी आणि युवकांच्या हाताला काम मिळावे हेच अजित पवार यांचे ध्येय राहिले आहे.
गतिमान प्रशासन
कृतिशील, गतिमान प्रशासन हे प्रगत समाजाचा आरसा असते आणि अजितदादांच्या प्रत्येक कृतीत याचेच प्रतिबिंब दिसते. लोकांसाठी सतत उपलब्ध असणे, अडीअडचणी सोडवणे विविध क्षेत्रातील मान्यवरांची अभ्यासपूर्ण चर्चा करून निर्णय घेणे आणि विकास साधताना कलात्मक दृष्टी जोपासण्याचे वृत्ती अजितदादा पवार यांनी अंगी बनवली आहे. राज्यात नव्हे तर देशात विक्रम ठरेल असे आत्तापर्यंत तब्बल पाच वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत असलेले, सत्तेची आस असलेले नव्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष अशी अजित पवार यांची ओळख आहे. आमदारकीच्या दुसऱ्याच कार्यकाळात त्यांनी मंत्रिपदी काम करण्यास सुरुवात केली. राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री तथा उपमुख्यमंत्रिपदाची संधी शरद पवार यांच्या सहकार्याने त्यांना मिळाली. अजित पवार यांनीही संधीचे सोने करत कृषी राज्यमंत्री, पाटबंधारे मंत्री, जलसंपदा मंत्री, ऊर्जामंत्री, अर्थमंत्री अशा विविध खात्यांचे त्यांनी यशस्वीपणे काम पार पाडले आहे .
प्रशासकीय प्रगल्भता
प्रशासनावर वचक असणारा नेता म्हणून अजित दादांची वेगळी ओळख आहे. सध्या महायुती सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहताना अर्थ मंत्रालयाची जबाबदारी मोठ्या ताकदीने ते पार पाडत आहेत. सत्तेची सगुण प्रतिमा, काम करण्याची तत्पर भूमिका, समाजातील प्रत्येक घटनेचे बारकाईने चिंतन, अवलोकन करणारे दूरदृष्टीचे नेतृत्व म्हणून अजितदादा सदैव आम्हा सर्वांसाठी आदरणीय आहेत. गेली साडेतीन दशके नामदार अजितदादा यांचे कार्य माझ्या नजरेसमोर साकारते आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वसा- वारसा ज्यांनी कायम जपला आहे असे एकमेवाद्वितीय नेतृत्व म्हणून अजित दादांचा सदैव उल्लेख करावा लागेल. पक्षीय कामकाज करत असताना तप, त्याग, विद्वत्ता आणि जनमानसातील आदर याद्वारे लोकमानसात या नेतृत्वाची निर्मिती घडली आहे. विविध पक्ष, संप्रदाय आणि गट वाढत चालले असतानाही अजितदादांनी पदनिरपेक्ष, सत्ता निरपेक्ष, तत्त्वनिष्ठ आणि निर्भय नेतृत्व समाजात सिद्ध केले आहे.
लोकसेवेचा वारसा
अजितदादांचे जीवन कार्य हा लोकसेवेचा जीवनयज्ञ आहे. त्यांच्या प्रत्येक सामाजिक वाटचालीत इतिहास व नियतीचे योगदान आहे. लोकशिक्षणाचा आधारवड म्हणून आम्हा सर्वांच्या वाटचालीचे ते निष्ठावंत आधारस्तंभ आहेत. शिरूर-आंबेगावच्या विकास कामातील योगदान माझ्या व्यक्तिगत जीवनात जातेगाव बुद्रुक येथील सरपंच या दृष्टीने ११वर्षे युवक अवस्थेतच सरपंच पदावरून ग्रामविकासाच्या विविध योजना साकारताना अजितदादा पवार यांचे बहुमोल योगदान राहिले आहे. नंतरच्या कालावधीत शिरूर बाजार समितीचा राज्यस्तरीय नावलौकिक माझ्या कारकिर्दीत वाढीस लागला. अकरा वर्षे शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्याला दिशा देणारी मॉडेल बाजार समिती म्हणून नावारूपास आलेली आहे. बाजार समितीच्या माध्यमातून पिंपळे- जगताप येथील उपबाजार समिती तसेच, शिरूर शहरातील व्यावसायिक गाळे, व्यापारी संकुल याद्वारे सहकारातून समृद्धीची वाटचाल निर्माण झाली. यामुळे शेतकऱ्यांसह अनेक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
शिरूर तालुक्यातील वेगवेगळ्या सहकारी संस्थांना पाठबळ देत शिरूर ग्रामीण पतसंस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील विविध सोसायटी आणि शेतकऱ्यांना कर्ज वाटप करणे सुकर झाले. दूरदृष्टी ठेवून उभ्या केलेल्या या पतसंस्थेच्या निर्मितीमुळे शेतकऱ्यांना अत्याधुनिक पद्धतीची शेती करण्यासाठी कर्जपुरवठा करणे शक्य झाले. तालुक्यातील दूध संकलनाबाबत व दुग्धजन्य पदार्थांवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आणि शिरूर तालुका दूध संकलनाबाबत अग्रणी तालुका म्हणून ओळखला जाऊ लागला.
सहकार क्षेत्रातील आमच्या परिवाराचा विशेष अभ्यास विचारात घेत पुणे जिल्हा कात्रज दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी आमच्या वहिनी केशरताई पवार यांना प्रथम महिला अध्यक्ष करण्याच्या निर्णयातूनच अजितदादांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो. बालाजी विश्व या बांधकाम व्यवसायात, तसेच पुणे जिल्हा विकास मंच या सामाजिक संस्थेच्या मार्गदर्शनात ज्येष्ठ बंधू तथा उद्योगपती सदाशिवराव पवार यांना दादांचे सातत्याने सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे. बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महान कामकाज पार पाडणे कामी अजित दादांनी सातत्याने मार्गदर्शन केले आहे.
व्यक्तिगत जीवनात कार्यकर्ता उभा करणेकामी दादांच्या मार्गदर्शनामुळे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्षपद, तसेच पुणे जिल्हा बाजार समितीचे संचालकपद मला प्राप्त झाले. केंदूर- पाबळ गटातील विविध दूध संस्था, वीज निर्मिती केंद्र, शिक्षण संस्था, प्रशासकीय इमारती, प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच या परिसरातील रस्ते विकासाचे जाळे उभारण्यासाठी अजितदादा पवार, तसेच या विभागाचे भाग्यविधाते नामदार दिलीपराव वळसे-पाटील यांचे सातत्याने सहकार्य राहिले आहे. रांजणगाव- सणसवाडी परिसरातील औद्योगीकरण, आमच्या जातेगाव बुद्रुक येथील शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, पर्यटन स्थळे, तीर्थक्षेत्रांचा विकास यासाठी दोन्ही मान्यवरांनी विशेष योगदान दिले आहे. नजीकच्या काळात पाबळ- केंदूर व परिसरातील १२ गावांचा पाणी प्रश्न, बेरोजगारांच्या हातात काम देणेकामी, या विभागात महिला सक्षमीकरणासाठी आवश्यक सेवा सुविधा, महिला बचत गटांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी व्यवसाय निवड, महिला उन्नती केंद्रांची उभारणी याबाबत प्रयत्नशील राहणार आहे.
गतिमान निर्णय क्षमता शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने कार्यरत असणारे नेतृत्व, तसेच नम्रता, चिकित्सक विचार आणि प्रत्येक क्षेत्रातील कामाचा अभ्यासू पद्धतीने विचार करत प्रकल्प मार्गी लावणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा होय.
नामदार अजितदादा पवार या अष्टपैलू नेतृत्वाच्या उत्तुंग कर्तृत्वास मंगळवारी (ता. २२) या त्यांच्या जन्मदिनानिमित्ताने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा व्यक्त करतो...
साहेब...
॥ यशवंत व्हा । जयवंत व्हा । कीर्तिवंत व्हा ।।
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.