सणसवाडीतील रस्त्याला अतिक्रमणांचा विळखा

सणसवाडीतील रस्त्याला अतिक्रमणांचा विळखा

Published on

सणसवाडी, ता. ९ ः येथील मुख्य चौकासह गावरस्ता, तळेगाव, इस्पात, नरेश्वर मंदिर रस्ता, ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर चौकासह सर्व रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे दररोज होत असलेल्या वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले आहेत. तसेच, ज्यांच्या जिवावर संपूर्ण गावची अर्थव्यवस्था अवलंबून आहे, ती जवळपास २५० कंपन्यांची संपूर्ण उद्योगनगरीही वैतागली आहे.
येथील वाहतूक कोंडीसाठी मोठी अतिक्रमण कारवाई होऊन चौक मोकळे झाले नाहीत, तर अनेक कंपन्या स्थलांतरित होण्याचाही धोका निर्माण झाला आहे. मंगळवारी (ता. ६) शिक्रापूरकरांनी वाहतूक कोंडीविरोधात एकत्र येत रास्ता रोको केल्याने शुक्रवारी (ता. १०) सर्वखात्यांची एकत्रित बैठक ठरली आहे. मात्र, येथील चौकात वाहतूक कोंडीबाबत स्थानिकांच्या अतिक्रमणांमुळे सणसवाडीकर मौन पाळून आहेत.
पुणे- अहिल्यानगर महामार्गावरच ही उद्योगनगरी असून, गावठाणाकडे जाण्यासाठीच्या रस्त्याच्या दुतर्फा मोठी अतिक्रमणे केली आहेत. मात्र, याबाबत सर्वजण मौन पाळून आहेत.
स्थानिकांच्या विरोधात आम्ही कसे बोलायचे म्हणून कंपन्यांचे कुणीही अधिकारी- मालक बोलायला घाबरतात. लेखी तक्रारी कराव्यात तर पुन्हा स्थानिकांकडून गळचेपी होण्याचाही धोका असल्याने बोलत नाहीत. वाहतूक कोंडी, अतिक्रमणे याबाबत प्रचंड संतापलेले आहेत. याबाबत तत्काळ कारवाई न केल्यास काही कंपन्या सणसवाडी सोडून दुसरीकडे जाण्याच्याही विचारात आहेत.

सणसवाडीतील अतिक्रमणे आणि वाहतूक कोंडीबाबत मी गेली कित्येक वर्षे लढत आलो आहे. मला राजकीय स्वार्थ नाही आणि मला कशाची फिकीरही नाही. त्यामुळे मी येथील अतिक्रमणाविरोधात पीएमआरडीए, बांधकाम खाते यांच्याकडे सतत पाठपुरावा करीत आलो तरीही ही खाती दाद देत नसल्याने मला आता ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे.
- अशोक दरेकर, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, शिरूर

सणसवाडीकरांनी आता भ्रमात राहू नये
कंपन्या जगल्या तर गाव चालेल हे लक्षात घ्या. स्थानिक अतिक्रमणांबद्दल, वाहतूक कोंडीबद्दल अनेक कंपन्यांच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त आहेत. हा प्रश्न थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीस्तरावर चर्चिला जाऊ शकतो. त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत, गावकारभारी यांनी आता भ्रमात राहू नये एवढेच आम्ही या निमित्ताने सांगतो.

पीएमआरडीए गायब
मागील वर्षी जुजबी कारवाई करून पीएमआरडीए जी गायब झाली ती पुन्हा सणसवाडीत फिरकलीच नाही. पर्यायाने या रस्त्याला, येथील वाहतूक कोंडीला, तुफान गतीने झालेल्या अतिक्रमणाला आता कुणीच वाली नसून, या प्रश्नी थेट जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक यांनीच लक्ष घालण्याची वेळ आलेली आहे.

रस्ता बांधकाम खात्याचा अन भाडी स्थानिकांना
येथील थाटलेल्या प्रत्येक दुकानांपुढील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मोकळ्या जागांमध्ये खाद्यपदार्थांच्या व इतर टपऱ्या उभारल्या गेल्या असून, या सर्वांची भाडी स्थानिक मंडळी घेतात. याबाबत सार्वजनिक बांधकाम खाते इकडे फिरकत नसल्याने स्थानिकांचे चांगलेच फावले असून, त्याचा मोठा फटका वाहतूक कोंडीला बसत आहेत.

05015

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com