माहेर संस्थेच्या नावानं गंडा!

माहेर संस्थेच्या नावानं गंडा!

Published on

शिक्रापूर, ता.१५ : अनाथ मुली-महिलांचा आधार होवून अगदी योग्य वाटले तरच त्यांचे लग्न लावून देणार्या वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथील माहेर संस्थेच्या नावाने बनावट पद्धतीने लग्ने लावून देण्याच्या अमिषाने ऑनलाइन पैसे गोळा करणारी एक टोळी शिक्रापूर पोलिसांनी थेट चंद्रपूर (जि.चंद्रपूर) नुकतीच जेरबंद केली. विशेष म्हणजे या टोळीत सर्व ७ सदस्य महिला असून पहिल्या धडक कारवाईत शिक्रापूर पोलिसांनी पाच महिलांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी दिली.
सपना भाऊराव पोडे (वय २६, रा.विसापुर, ता.बल्लारशाह, जि.चंद्रपूर), प्रियंता नितेश जांगळे (वय ३३, रा.पंचशील चौक, दुर्गापूर, जि.चंद्रपूर), भूमिका सुरेश सौंदरकर (वय २४, सुमित्रानगर, तुकुम, जि.चंद्रपूर), प्रांजली सुभाष सुखदेवे (वय २०, रा.सालोरी, एन्सा ब्लॉक, पोस्ट चिनोरा, ता.वरोरा, जि.चंद्रपूर), आचल आशिष बोरेवार (वय २५, रा.हनुमाननगर, तुकुम, जि.चंद्रपूर) याच पाचही जणीं रवानगी
न्यायालयीन कोठडीत केली असून आणखी दोघींना लवकर अटक करण्यात येईल, अशी माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली. तर नारायण शिरोडकर (रा.तळगाव सुकडगाव, ता.मालवण, जि.सिंधूदुर्ग) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नारायण सत्यवान शिरोडकर (वय ५६, रा.तळगाव-सुकडगाव, ता.मालवण, जि.सिंधूदुर्ग) यांनी शिवहरी यशवंत लेले यांच्या लग्नासाठी सोशल मीडियातील काही पोस्टनुसार ७५०७१८९७१३ व ९०६७७५१०४३ या नंबरवर संपर्क केला. यावेळी वढु बुद्रुक येथील माहेर संस्थेतून संगीता भोसले बोलत असून आम्ही आमच्या संस्थेतील अनाथ मुलींची लग्ने लावून देतो असे सांगितले. यासाठी ७ हजार, १२ हजार व १९ हजार असे तीनवेळा या महिलेने लेले यांच्याकडून पैसे मागावून घेतले. यानंतर संबंधित महिलेने पैसे मिळाल्याच्या पावत्या व माहेर अनाथाश्रम सहमती फिर्यादी यांनी शिक्रापूरात येत पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले व स्वत:च्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार महेंद्र पाटील, उद्धव भालेराव व रुपाली निंभोरे यांचे एक तपास पथक चंद्रपूरकडे रवाना केले. या तपास पथकाने योग्य पावले टाकत अखेर सात महिलांचा पर्दाफाश केला असून दोघी फरार आहेत.


टोळीने मागणी-पुरवठ्याचा सिद्धांत वापरला!
उच्चशिक्षित आणि रोजगारक्षम मुली, मुलींच्या वाढत्या अपेक्षा आणि त्या तुलनेत मुलांची करीअर अस्थिरता, शहरी-ग्रामिणमधील वाढलेली दरी यामुळे मुलांची लग्ने जमणे खरोखरीच कठीण होवून चांगल्या उपवर मुली अत्यल्प आहेत. पर्यायाने कमाल संख्येने असलेल्या उपवर मुलांसाठी मुलीच मिळत नसल्याने आणि या विषयातील फसवणूक कुणाला सांगता येत नसल्याने ही अत्यंत सुरक्षित व्यवसाय या टोळीने स्वीकारल्याची माहिती तपासातून पुढे आली.

मार्केटींग फक्त सोशल मिडीयावरच
आरोपी चंद्रपूरचे तर फिर्यादी कोकणातील. हे पाहता या टोळीने केलेले सोशल ‘टार्गेटेड’ मीडिया मार्केटींगमुळे वरील फसवणूक झाली असून पोलिसांच्या माहितीनुसार वरील टोळी ही गेली अनेक दिवस कार्यरत असल्याने असे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. फक्त तक्रारदारांनी पुढे यावे, असेही आवाहन शिक्रापूर पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com