दोनही मतदारसंघाला सभापतिपदाची संधी
दोनही मतदारसंघाला सभापतिपदाची संधी
शिरूर पंचायत समितीसाठीच्या एकूण १४ जागांसाठी यावेळी राज्यात बदललेल्या राजकारणाचा मोठा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे. मागील वेळी १४ पैकी ८ सदस्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राहिले असल्याने आणि तालुका हा शिरूर-हवेली आणि आंबेगाव-शिरूर अशा दोन मतदारसंघात विभागला गेला आहे. त्यात दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार विधानसभेत गेल्याने राष्ट्रवादी मोठ्या जोशात या निवडणुकीत उतरल्याचे चित्र आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजपकडून म्हणाव्या तितक्या आक्रमक पद्धतीने पंचायत समिती निवडणुकीतील व्यूहरचना सुरू नाही.
- भरत पचंगे, शिक्रापूर
शिरूर पंचायत समितीचे सभापतिपद यावेळी इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले असून, शिरूर व टाकळी हाजी या गणांमध्येच हे आरक्षण पडले आहे. पर्यायाने याच गणातील सभापती असणार, हे नक्की. पर्यायाने या गणांमध्ये पंचायत समितीसाठीची मुख्य स्पर्धा सर्वच पक्षांमधील इच्छुकांमध्ये दिसून येतेय. हे दोन्ही गणही दोन वेगवेगळ्या विधानसभा गटात असल्याने सभापतिपदाची संधीही समसमान साधली गेली आहे. यातील शिरूर गण हा विधानसभेच्या शिरूर मतदारसंघात; तर टाकळी हाजी गण हा आंबेगाव मतदारसंघात येत आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील सर्वपक्षीय दिग्गज नेते मंडळींनी या गणांतील वर्चस्वासाठी आतापासूनच व्यूहरचना सुरू केली आहे. सध्याच्या स्थितीत महायुतीचेच वर्चस्व आहे. शिरूर पंचायत समितीत गेली दहा वर्षे सभापतिपदी महिलाच राहिल्या आहेत. त्यातच आता पुन्हा ओबीसी महिलेसाठी हे आरक्षण आल्याने पंचायत समितीवरील महिलाराजची हॅटट्रिक यावेळी होणार आहे.
वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांची विजयासाठी ज्या पद्धतीने शिरुरकरांनी दमछाक केली आणि दुसरीकडे अशोक पवार यांची मोठ्या मताधिक्याची पिछाडी झाली. हे पाहता शिरुरकर आगामी पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भाजप, शिवसेना व थोडकी ताकद असलेल्या कॉंग्रेसची आहे.
आंबेगाव-शिरूर मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर व नुकतेच भाजपत गेलेले माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांच्या रांजणगाव गणपती या खुल्या गटाची लढत रंगतदार असणार आहे. मानसिंग हे त्यांची पत्नी रणांगणात उतरवीत आहेत, तर शेखर हे त्यांची भावजय माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर यांना उतरवीत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे व जयेश शिंदे यांचे गण महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांच्यासाठी शिरूर पंचायत समितीत येऊन सभापती होण्याचे इच्छा व संधी दोन्हीही हुकलेली आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे यांनाही शिक्रापूर गटातून आरक्षणामुळे माघार घ्यावी लागली. त्यांना अखेर शिक्रापूर गणातून पंचायत समितीसाठी लढावे लागत आहे.
मागील बलाबल
शिरूर पंचायत समितीवर गतपंचवार्षिकला पूर्वीच्या एकसंध राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व होते. एकूण १४ सदस्यांपैकी तब्बल आठ सदस्य राष्ट्रवादीचे होते. यावेळी मात्र हे दोन्ही राष्ट्रवादीच्या गटांत (पक्षात) विभागले गेल्याचे चित्र आहे. मागील पंचायत समितीवरील आठ सदस्यांशिवाय भाजपचे तीन, लोकशाही क्रांती आघाडीचे दोन आणि शिवसेनेचा एक, असे सदस्य बलाबल होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

