शिक्रापुरात महामार्गावरील खड्ड्यात ठिय्या
शिक्रापूर, ता. ४ : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील शिक्रापुरातील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरलेल्या चाकण चौकातील थेट खड्ड्यांमध्येच बसून भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची तत्काळ दखल घेत सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता राहुल कदम यांनीही याच खड्ड्यात चर्चेसाठी बैठक मारली आणि पुढील तासाभरात येथील चौकातील रस्ता दुरुस्तीचे कामही सुरू झाले.
पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक कोंडीला सर्वाधिक कारणीभूत ठरलेल्या चाकण चौकात चाकणहून येणाऱ्या रस्त्याची अक्षरश: चाळण झालेली आहे. शिक्रापूरकरांनी याबाबत अनेकवेळा तक्रारी केल्या, अनेक बैठकाही झाल्या. मात्र गेल्या महिनाभरात बांधकाम खात्याकडून या खड्ड्यांसाठी काहीच उपाययोजना झालेली नव्हती. याच पार्श्वभूमिवर मंगळवारी (ता. ४) सकाळी साडेअकराच्या सुमारास पाचंगे यांनी काही कार्यकर्त्यांसह येथील भर चौकातील एका मोठ्या खड्ड्यातच ठिय्या मांडला व आपले आंदोलन सुरू केले. शिक्रापूर पोलिसांनीही या ठिकाणी आपला पोलिस फौजफाटा उपस्थित केला. पाचंगे खड्ड्यात बसताच काही वेळातच सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता राहुल कदम हे या ठिकाणी पोहचेल. पाचंगे यांच्यासमवेत कदम यांनीही खड्ड्यात बैठक मारली आणि पाचंगे यांच्याशी चर्चा सुरू केली.
कदम म्हणाले , ‘‘की हा रस्ता हा केवळ देखभाल दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे असून मूळ रस्त्याची मालकी ही रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांच्याकडे असल्याचे सांगितले. या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी ६० कोटींच्या निधीला नुकतीच मंजुरीही मिळाली असून कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू आहे.’’ मात्र, पाचंगे यांनी या रस्त्याची दुरुस्ती सुरू करण्यासाठी खड्ड्यातून उठायलाच नकार दिल्याने अखेर कदम यांनी त्यांच्या स्तरावरच या चौकातील ४०० ते ५०० मिटर हद्दीतील सर्व खड्डे तत्काळ बुजवून डांबरीकरण करण्याची ग्वाही दिली आणि तत्काळ सर्व कामाची यंत्रणा, मजूर व डांबर-खडीची मशिनही शिक्रापुरात मागवून घेतली. पुढील एक तासात सदर दुरुस्ती कामाचा प्रारंभ झाला आणि पाचंगे यांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी सणसवाडीचे माजी उपसरपंच सागर दरेकर, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे गणेश डफळ, सचिन जाधव, गुलाब पवार, बंटी पवार, उद्योगपती मंगेश सासवडे, भूमाता ब्रिगेडच्या मंगल सासवडे, सतीश सासवडे, अॅड-प्रवीण कर्डिले, भाजप आध्यात्मिक आघाडीचे शिरूर तालुकाध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड, सुरेश खुरपे, संतोष चौरासिया आदी उपस्थित होते. शिक्रापूरचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल देशमुख, फौजदार विजय मस्कर, हवालदार अमोल चव्हाण, श्रीमंत होनमाने, विकास पाटील, जयराज देवकर, शिवाजी चितारे, राहुल वाघमोडे, जिल्हा विशेष शाखेचे अनिल जगताप व पोलिसांनी परिस्थिती उत्तम हातळली.
प्रशासन आणि स्थानिकांच्या वादात...
चाकण चौकात प्रत्येक पावसानंतर प्रचंड पाणी साठते. त्याचे कारण या रस्त्याच्या कडेला जी गटर व्यवस्था हवी ती नाही. या रस्त्यावरील पाणी दुसरीकडे जायलाही जागा नाही. या प्रश्नी स्थानिकांनी मार्ग काढणे गरजेचे आहे. स्थानिक ग्रामपंचायत, या भागात ज्यांच्या जागा आहेत ते आणि इतर स्थानिक शिक्रापूरकर यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. केवळ बांधकाम खात्याच्या नावाने ओरड करून या प्रश्नी कायमचा तोडगा निघणार नाही. त्यातच काही स्थानिक त्यांच्या जागा परताव्यासाठी न्यायालयातही गेलेले आहेत. न्यायालयीन बाब असल्याने प्रशासकीय यंत्रणाही काम करण्यास धजावत नाही. अशा परिस्थितीत प्रशासन आणि स्थानिकांच्या वादात संपूर्ण महामार्ग वेठीला धरला जातोय हे मात्र वास्तव बोचरे आहे हे नक्की.
5058
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

