सणसवाडीतील एकावर खंडणीचा गुन्हा

सणसवाडीतील एकावर खंडणीचा गुन्हा

Published on

सणसवाडी, ता. ६ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे भारतीय हवाई दलातील एका माजी सैनिकाच्या जमिनीचा व्यवहार पूर्ण केलाच नाही. उलट त्यालाच शिवीगाळ, दमदाटी करून जमीन नावावर करण्याचा तगादा लावल्याने आणि बळजबरीने अनधिकृतपणे कंपाउंड व रस्त्यावरून जमिनीतील माती जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने काढल्याने विजयकुमार बबनराव दरेकर (रा. सणसवाडी, ता. शिरूर) याच्यावर शिक्रापूर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेवानिवृत्त हवाई दल सैनिक हिमांशुकुमार प्रभुनाथ सिंग (वय ५१, रा. वाघोली, ता. हवेली, मूळ रा. तक्कीपूर, ता. महाराज, जि. सिवान, बिहार) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव ढमढेरे येथे फिर्यादी सिंग यांची जमीन होती. ती त्यांनी दरेकरला विकली होती. या खरेदी व्यवहारावेळी दरेकरने सिंग यांना फक्त ५० हजार रुपये ऑनलाइन हस्तांतरित केले होते व १४ लाख रुपयांचा धनादेश दिला होता; मात्र या व्यवहारापोटी दिलेला धनादेश वटलाच नाही. याविरोधात सिंग यांनी दरेकर विरोधात न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यांनतर वारंवार दरेकरने सिंग यांना जमीन नावावर करून देण्यासाठी दमदाटी सुरू केली होती. सिंग हे त्यांच्या संबंधित जमिनीकडे गेलेले असता, या ठिकाणचे तार कंपाउंड काढून भिंतीचे कंपाउंड व रस्ता केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या शिवाय या जमिनीमधून जेसीबी व चार ट्रॅक्टरच्या साहाय्याने माती काढून थेट प्लॉटिंग सुरू केल्याचे त्यांना दिसून आले. याबाबत दरेकरकडे चौकशी केली असता, ‘तुम्ही मला जमिनीचे विकासाचे सर्व अधिकार दिलेले असल्याचे त्याने सांगितले; तर सिंग यांनी मी तुम्हाला कुठलेही अधिकार दिलेले नसून, तुझ्याकडे काय आहे ते दाखव’, असे म्हणताच दरेकरने ‘तू मला जमीन दिली नाही तरी मी बळजबरीने जमीन घेणार, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रेवणनाथ मुत्तनवार हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com