‘शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी’

‘शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी’

काटेवाडी, ता. १३ : ‘शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी’ या संत वचनामध्ये बीजप्रक्रियेचे महत्त्व सांगितले गेले आहे. निरोगी पिकासाठी बीज प्रक्रिया हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. यंदाच्या वर्षी हवामान विभागाने समाधानकारक पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सहाजिकच कृषी विभागासह शेतकऱ्यांची सुद्धा आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर धांदल उडाली आहे.
विविध कीड व रोगांपासून वाचविण्यासाठी पेरणीपूर्व बीज प्रक्रिया व उगवण क्षमता तपासणी करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


बीजप्रक्रियेमुळे जमिनीतून व बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. बियाणांची उगवण क्षमता वाढते. रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात. पिकाच्या उत्पादनात वाढ होते. . रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी घेणे गरजेचे आहे. बियाणे प्रक्रियेसाठी मातीचे किंवा प्लास्टिक भांड्याचा वापर करावा. या भांड्यांचा वापर अन्न शिजवण्यासाठी करून नये. बीजप्रक्रियेनंतर भांड्याचे झाकण किंवा प्लास्टिक पिशवीचे तोंड लगेच उघडू नये. बीजप्रक्रियेनंतर शिल्लक राहिलेले बियाणे जनावरांच्या किंवा मनुष्याच्या खाण्यासाठी वापरू नये. उत्तम बियाण्याची निवड करणे यासोबतच योग्य ती बीजप्रक्रिया करणे हे भरघोस पीक घेण्याच्या दृष्टीने तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे बियाण्याला बीजप्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे.

पेरणीपूर्व बीज संस्कार महत्त्वाचा
पेरणीपूर्व बीज संस्कार करणे आवश्यक आहे. द्विदल पिकासाठी जैविक खते, रायझोबियम, ट्रायकोडरमा, पिएसई तसेच एकदल पिकासाठी अ‍ॅझोटोबॅक्टर, पिएसई, ट्रयकोडरमा तर ऊसासाठी असेटोबॅक्टरद्वारे बीजप्रक्रिया करावी. बीजप्रक्रिया करताना प्रथम बुरशीनाशक त्यानंतर किटकनाशक व सर्वात शेवटी जैविक खतांच्याद्वारे या प्रकारे करणे आवश्यक आहे. यामुळे पिकांना वातावरणातील खतांची उपलब्धता होऊन रासायनिक खतांची २० टक्के बचत तर पीक उत्पादनामध्ये १५ टक्के वाढ होते.

बियाण्यापासून उद्भवणारे पिकावरील महत्त्वाचे रोग
गहू : मोकळी काणी, हील बंट, करनाल बंट, ग्लुम ब्लॉच, पानावरील करपा,मुळकुजव्या, इअर कॉकल
बाजरी : केवडा, साखया, पानावरील ठिपके, दाणे काणी.
ज्वारी : मोकळी काणी, केवडा, लांब काणी, साखया, मुळकुजवा, खोडकुजव्या, बिज कुज, पानावरील ठिपके,
मका : काणी, केवडा, रोप करपा, खोड व शेंडा कुज, पानावरील ठिपके, मर.
तूर : राखाडी खोडावरील करपा, काळा करपा, असकोकायटाचा पानावरील करपा,जिवाणूंचा पानावरील करपा, विषाणूजन्य रोग, मर.
भुईमूग : मूळ व खोड कुजवा, असपरजीलचा नावरील करपा.
सोयाबीन : काळा करपा, मूळकुजव्या, केवडा, जिवाणू पानावरील करपा, विषाणूजन्य रोग, शेंडा करपा.


अशी करा बीज प्रक्रिया...
१. एक किलो बियाण्यास लागणाऱ्या बुरशीनाशकाचे प्रमाण घेऊन बियाण्यास चोळावे.
२. बियाण्यास पाण्याचा शिंपडा देऊन ओले करून घ्यावे.
३. ही प्रक्रिया करताना हातामध्ये रबरी किंवा प्लॅस्टिकचे हातमोजे वापरावेत.
४. मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया केल्यास पाण्याच्या प्रमाणात थोडीफार वाढ करावी.
५. जेणेकरून बुरशीनाशक बियाण्यास सारख्या प्रमाणात सहजतेने चिकटेल.
६. यानंतर प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावे.

जिल्ह्यात १५ जूननंतर खरिपाच्या पेरण्यांना सुरुवात होत असते.
तत्पूर्वी यंदा हवामान विभागाने पाऊस समाधानकारक असल्याची शक्यता वर्तवली आहे. यंदा पाऊस समाधानकारक झाल्यास पेरण्यांची लगबग उडेल. अशा परिस्थितीमध्ये पेरणीपूर्व काही खबरदारी घेण्याची गरज असते. बीज संस्कार व बियाणे उगवण क्षमता तपासणी प्रक्रिया देखील तितकीच गरजेची आहे. बीज प्रक्रिया रासायनिक व सेंद्रिय या दोन्ही पद्धतीने करता येते. शेतकऱ्यांना जी पद्धत अवगत आहे व योग्य वाटते त्या पद्धतीने बीज प्रक्रिया करून घ्यावी. त्यामुळे ऐन पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांची धावपळ होणार नाही.
- सुप्रिया बांदल, तालुका कृषी अधिकारी बारामती

19621, 19622

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com