शरद पवार यांचे शब्द अखेर ठरले खरे

शरद पवार यांचे शब्द अखेर ठरले खरे

काटेवाडी, ता. ४ : सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आवर्जून आपल्या पहिल्या निवडणुकीच्या परिस्थितीचा उल्लेख केला होता. ‘त्यावेळेसारखी जनतेनेच ही निवडणूक हाती घेतली आहे,’ असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांचे ते शब्द सुप्रिया सुळे यांच्या विजयामुळे खरे ठरले.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात होत असताना शरद पवार यांनी बारामती येथील पक्षाच्या नवीन कार्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी, ‘मी लढवलेली पहिली निवडणूक जनतेने हाती घेतली होती. आताचेही चित्र काहीसे वेगळे नाही,’ असे सांगितले होते. त्यांचे ते शब्द अखेर खरे ठरले.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक नेते, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींची मोठी फळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठीशी उभी राहिली होती. नेते कार्यकर्ते यांनी जरी अजित पवार यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला असला तरी सर्वसामान्य मतदार मात्र त्यांना आपल्या बाजूने खेचता आला नाही. नेते कार्यकर्ते एका बाजूला व सर्वसामान्य मतदार एका बाजूला, असे चित्र सुरुवातीपासूनच या मतदारसंघांमध्ये राहिले.
सुरुवातीपासूनच खासदार सुप्रिया सुळे यांना स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची मोट बांधणे जिकरीचे झाले होते. ऐनवेळी अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवार यांची सोबत केली होती. त्यामुळे शेवटपर्यंत सुळे यांना बूथ मेंबर मिळवणेदेखील मुश्कील झाले होते. कार्यकर्ते व पदाधिकारी जरी त्यांच्यासोबत नसले तरी सर्वसामान्य मतदार मात्र त्यांच्यासोबत आहे, असे निष्कर्ष निघत होते. त्यावर या निकालाने शिक्कामोर्तब केले. त्यामुळे शरद पवार यांचे ते शब्द अखेर खरे ठरले, अशी चर्चा सुरू झाली आहे.

शरद पवार यांच्या पहिल्या निवडणुकीचा इतिहास
ऑक्टोबर १९६६ मध्ये तत्कालीन विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले होते. त्यावेळी अवघ्या २६ वर्षांच्या शरद पवार यांना तत्कालीन काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी, ‘बारामतीतून संधी मिळाली तर लढशील का?’ असे विचारले होते. पाटील यांच्या सांगण्यावरून शरद पवार यांनी त्यावेळी अर्ज भरला होता. मात्र, नवख्या शरद पवार यांना स्थानिक पातळीवरून प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागले. एकमुखाने सर्वांनी पवार यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतला. तालुक्यातील काँग्रेस कार्यकारिणीने त्यांच्या नावाला विरोध करत १ विरुद्ध ११, अशी शिफारस प्रदेश काँग्रेसकडे पाठवली. जिल्हा काँग्रेस शाखेकडून देखील दुसऱ्या कोणालाही उमेदवारी द्या, असा थेट निर्वाणीचा इशारा यावेळी दिला गेला होता. जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी शरद पवार यांच्या नावाला विरोध केला. मात्र, तरी देखील विनायकराव पाटील व यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवार यांच्या उमेदवारीचा आग्रह सोडला नाही. तसेच, जिल्ह्यातील नेत्यांनीही पवार यांच्या उमेदवारीला आपला नकार कायम ठेवला. मात्र, थेट निर्वाणीचा इशारा देत यशवंतराव चव्हाण यांनी, ‘बारामतीची एक जागा गेली असं समजा आणि शरदलाच उमेदवारी द्या’ असे निक्षूण सांगितल्यानंतर पवार यांची उमेदवारी पक्की झाली. मात्र, यशवंतराव चव्हाण यांच्या या निर्णयाच्या विरोधात बारामती तालुक्यातील सर्व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. यावेळी शरद पवार यांच्या विरोधात सर्वपक्षीय उमेदवार म्हणून सोमेश्वर कारखान्याचे संचालक बाबालाल काकडे यांना निवडणुकीला उभे केले गेले. यावेळी देखील बारामतीमध्ये तत्कालीन काँग्रेसचे सर्व स्थानिक नेते कार्यकर्ते व पदाधिकारी एका बाजूला गेले. तर, सर्वसामान्य मतदार पवार यांच्या पाठीशी उभा राहिला. या निवडणुकीमध्ये शरद पवार यांचे बंधू दिनकरराव पवार व अनंतराव पवार यांनी प्रचाराची संपूर्ण धुरा सांभाळली. काँग्रेसचे स्थानिक मातब्बर नेते विरोधात गेले असताना देखील शरद पवार यांनी या निवडणुकीमध्ये सहज विजय संपादन केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com