विरोधकांना पद देण्याचा ‘छत्रपती पॅटर्न’ निष्प्रभ
काटेवाडी, ता. ५ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या स्थानिक राजकारणात आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत वापरलेल्या वेगळ्या राजकीय पॅटर्नची रणनीती यशस्वी ठरली होती. स्थानिक कट्टर विरोधकांना मोक्याचे पद देऊन त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा हा ‘छत्रपती पॅटर्न’ माळेगावच्या निवडणुकीत निष्प्रभ ठरला आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीदरम्यान तावरे गटाचे नेते चंद्रराव तावरे यांनी अजित पवारांनी अध्यक्षपदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट करत ही रणनीती उघड केली. मात्र जोपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तावरे यांच्या विधानावर प्रत्युत्तर येत नाही तोपर्यंत तावरे यांचा हा दावा कितपत खरा आहे, यावर प्रश्नचिन्ह असणार आहे. मात्र या रणनीतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आणि पारंपरिक विरोधक असलेला भारतीय जनत पक्ष (भाजप) सावध झाला आहे.
न्यायालयाने नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुका बारामतीच्या राजकीय समीकरणांसाठी निर्णायक ठरणार आहेत. अजित पवार या संधीचा उपयोग ‘छत्रपती पॅटर्न’द्वारे स्थानिक विरोधी नेत्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी करू शकतात. प्रभावी पदांचे आश्वासन देऊन ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत आपला प्रभाव वाढवण्याचा त्यांचा मानस आहे.
विरोधी गटातील प्रभावशाली नेत्यांना मोठी पदे किंवा जबाबदाऱ्या देऊन त्यांचा पाठिंबा हा ‘छत्रपती पॅटर्न’चा गाभा आहे. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांनी कट्टर विरोधक पृथ्वीराज जाचक यांना नेतृत्वाची संधी देऊन हा पॅटर्न यशस्वीपणे राबवला आणि बिनविरोध विजय मिळवला. याच धर्तीवर माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत चंद्रराव तावरे यांना अध्यक्षपदाची ऑफर देऊन त्यांना आपल्या गोटात सामील करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तावरे यांनी ही ऑफर जाहीरपणे उघड केल्याने अजित पवारांच्या रणनीतीवर पाणी फिरले आहे. अजित पवारांचा ‘छत्रपती पॅटर्न’ हा बारामतीच्या राजकारणात नवे वळण आणणारा ठरू शकतो. मात्र, रणनीती उघड झाल्याने त्यांच्या यशाचा मार्ग खडतर झाला आहे. स्थानिक नेते आणि विरोधकांनी सावध पवित्रा घेतल्याने आगामी निवडणुका बारामतीच्या राजकीय समीकरणांना नवे स्वरूप देणाऱ्या ठरतील.
दीर्घकालीन राजकीय परिणाम.
''छत्रपती पॅटर्न’ यशस्वी झाल्यास अजित पवार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला दबदबा वाढवू शकतात, ज्याचा फायदा २०२९ च्या निवडणुकीत होऊ शकतो. मात्र, तावरे यांच्या खुलाशानंतर या रणनीतीची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. शरद पवार गट आणि स्थानिक विरोधक आता अधिक आक्रमकपणे या रणनीतीला प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता अधिक चाणाक्ष आणि गुप्त रणनीती आखावी लागेल. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुका या रणनीतीच्या यशाचे मोजमाप ठरतील. त्यानुसारच बारामतीच्या स्थानिक राजकारणाची दिशा ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.