डासजन्य आजारांचा धोका वाढला

डासजन्य आजारांचा धोका वाढला

Published on

काटेवाडी, ता. १२ : सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यामुळे डासांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. यामुळे डेंगी, चिकनगुनिया, मलेरिया आणि इतर विषाणूजन्य आजारांचे रुग्ण वाढत असल्याचे आरोग्य विभागाच्या नोंदीतून समोर आले आहे. डासांमुळे पसरणारे हे आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
पावसामुळे साचलेले पाणी, वाढलेले गवत आणि गटारींमध्ये तुंबलेले दुर्गंधीयुक्त पाणी यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने सर्व ग्रामपंचायतींना धूर फवारणीचे आदेश दिले आहेत. हिवताप नियंत्रण केंद्राकडून बारामती शहरातील नवीन बांधकामांच्या स्लॅबवरील पाणी निचरा करण्याच्या सूचना आहेत. जिथे गरज आहे तिथे गप्पी मासे सोडण्यास सांगितले आहेत. एडीस डास स्वच्छ पाण्यात, तर अॅनोफिलिस डास घाण पाणी आणि गवतात वाढतात, ज्यामुळे डेंगी, चिकनगुनिया आणि मलेरियाचा धोका वाढला आहे.

डेंगी, चिकनगुनिया, संसर्गजन्य आजाराची लक्षणे :
- डेंगी हा एडीस इजिप्ती डासांमुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. डास चावल्यानंतर ४-१० दिवसांत तीव्र ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, पुरळ आणि गंभीर प्रकरणांत रक्तस्रावाची लक्षणे दिसतात.
- चिकनगुनियामुळे २-१२ दिवसांत ताप, तीव्र सांधेदुखी, सूज, पुरळ, थकवा आणि मळमळ दिसते. सांधेदुखी काही रुग्णांत महिनोन्महिने टिकू शकते.
- मलेरिया अॅनोफिलिस डासांमुळे होतो. १० ते १५ दिवसांत थंडी वाजून ताप, डोकेदुखी, उलट्या आणि गंभीर प्रकरणांत अॅनिमिया किंवा अवयव निकामी होण्याची लक्षणे दिसतात.
- व्हायरल इन्फेक्शनमध्ये ताप, अंगदुखी, थकवा आणि श्‍वसनाचा त्रास दिसतो. ही लक्षणे डेंगी किंवा चिकनगुनियासारखी वाटू शकतात, म्हणून रक्त तपासणी गरजेची आहे.

लोकांनी घ्यावयाची काळजी :
- पाण्याचा निचरा : फुलदाण्या, कुलर, टायर्समधील पाणी काढा, कारण एडीस डास स्वच्छ पाण्यात वाढतात.
- संरक्षणात्मक कपडे : पूर्ण भाई असलेले कपडे घाला. विशेषतः सकाळ-संध्याकाळी असा पेहराव करावा.
- मच्छरदाणी, कीटकनाशके : मच्छरदाणी आणि लिंबू-निलगिरी तेलयुक्त कीटकनाशके वापरा.
- स्वच्छता : घर, परिसर स्वच्छ ठेवा, खिडक्यांना जाळ्या लावा, फॉगिंग करा.
- वैद्यकीय सल्ला : ताप, सांधेदुखी दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा. रक्त तपासणी आवश्यक आहे.

डासजन्य आजार रोखण्यासाठी प्रतिबंध हाच उपाय आहे. नागरिकांनी स्वच्छता राखावी आणि लक्षणे दिसल्यास वैद्यकीय मदत घ्यावी. ग्रामपंचायतींनी धूर फवारणी आणि जनजागृतीची मोहीम तीव्र केली आहे.
- डॉ. मनोज खोमणे, तालुका आरोग्य अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com