आर्थिक सक्षमीकरणासाठी उत्पादक कंपनीची संकल्पना प्रभावी
काटेवाडी, ता.२५ : ‘‘शेती क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीसी) ही एक प्रभावी संकल्पना ठरत आहे. कंपनी कायदा १९५६ अंतर्गत कलम ५८१ नुसार नोंदणीकृत होणाऱ्या या कंपन्या शेतकऱ्यांना उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या सर्व प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देतात. कंपन्या शेतकऱ्यांच्या प्राथमिक उत्पादनांचे मूल्यवर्धन आणि बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात’’, असे मत बारामती येथील कृषी विभागाचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश जाधव यांनी दिली.
शेतकरी उत्पादक कंपनीचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या उत्पादन प्रक्रियेला गती देणे आणि त्यांना बाजारपेठेत थेट स्थान मिळवून देणे हा आहे. यामध्ये उत्पादन, कापणी, खरेदी, प्रतवारी, संकलन, हाताळणी, प्रक्रिया, साठवणूक, पॅकिंग, जाहिरात आणि विक्री यांचा समावेश होतो. याशिवाय, शेतकऱ्यांना उत्तम दर्जाच्या सेवांसाठी आयात आणि निर्यातीची सुविधा उपलब्ध करणे हा देखील या कंपनीचा हेतू आहे. या प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांचा योग्य मोबदला मिळण्यास मदत होते. अधिक माहितीकरिता मुंबई किंवा पुणे येथील आरओसी कार्यालयाशी संपर्क साधावा.
उत्पादक कंपनीसाठी या गोष्टींची पूर्तता आवश्यक
* संचालक आणि प्रवर्तक: किमान पाच आणि जास्तीत जास्त १५ संचालक आवश्यक. ५ संचालक आणि ५ प्रवर्तक एकत्र येऊन नोंदणी करू शकतात. प्रवर्तक आणि संचालक एकच असू शकतात.
* कागदपत्रे: संचालकांचा पासपोर्ट आकाराचा फोटो, पॅन कार्ड, निवासी पुरावे (वीज बिल, टेलिफोन बिल, बँक स्टेटमेंट, पासपोर्ट, मतदान कार्ड किंवा ग्रामपंचायत दाखला), ७/१२ उतारा.
* डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (डीएससी): किमान एका संचालकाचे किंवा अध्यक्षाचे डीएससी आवश्यक. कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागतो.
* डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर (डीआयएन): नोएडा येथील कंपनी अफेअर कक्षाकडून ऑनलाइन मिळतो. यासाठी पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड किंवा पासपोर्ट आवश्यक.
* कंपनीचे नाव: नाव “…उत्पादक कंपनी लिमिटेड” असे असावे आणि यापूर्वी नोंदणीकृत नावाशी साम्य नसावे. ५०० रुपये शुल्कासह ई-फॉर्म A सादर करावा लागतो.
* मेमोरँडम ऑफ असोसिएशन (एमओए) आणि आर्टिकल ऑफ असोसिएशन (एओए): कंपनीचे उद्देश, कार्यक्षेत्र, सदस्यत्व नियम नमूद करून स्टॅम्प लावून प्रवर्तकांच्या स्वाक्षऱ्या घ्याव्या लागतात.
* रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (आरओसी) कडे कागदपत्रे: एमओए, एओए, फॉर्म १८ (कार्यालयाचा पत्ता), फॉर्म ३२ (संचालकांची माहिती), फॉर्म २० (संचालकांचे संमतीपत्र) सादर करावे. सर्व कागदपत्रे पूर्ण झाल्यास ३० दिवसांत नोंदणी प्रमाणपत्र मिळते.
नोंदणीनंतर हे करणे आवश्यक
* बँक खाते: किमान दोन स्वाक्षऱ्यांचे बँक खाते उघडावे.
* कर नोंदणी: आयकर विभागाकडून पॅन कार्ड, कॉर्पोरेट टॅक्स विभागाकडून टीएएन क्रमांक, जीएसटी, शॉप अँड एस्तब्लिशमेंट अॅक्ट आणि आयात-निर्यात कोडसाठी नोंदणी.
* कार्यालय व्यवस्था: वीज पुरवठा, फर्निचर आणि नामफलक उपलब्ध करावे.
* सभा : नोंदणीनंतर ३० दिवसांत संचालक मंडळाची सभा आणि ९० दिवसांत वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करावी. वार्षिक सभेत व्यवसाय आराखडा, अंदाजपत्रक, संचालक आणि व्यवस्थापक नियुक्तीला मंजुरी दिली जाते.
* ऑडिट अहवाल: दरवर्षी ३० मार्चपर्यंत ऑडिट अहवाल आरओसीकडे सादर करावा.
असे आहेत शेतकरी उत्पादक कंपनीचे फायदे...
ही कंपनी शेतकऱ्यांना बाजारपेठ माहिती, तारण कर्ज, करार शेती, पीक विमा, प्रशिक्षणे आणि अभ्यास दौरे यांसारख्या सुविधा पुरवते. नाबार्ड आणि स्मॉल फार्मर्स अॅग्री-बिझनेस कन्सोर्टियम (एसएफएसी) यांच्याकडून व्हेंचर कॅपिटल, इक्विटी ग्रँट (१० लाखांपर्यंत) आणि एक कोटीपर्यंतच्या कर्जासाठी बँक हमी मिळू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.