आषाढ वारीत डीजे, साउंड सिस्टिम टाळा
काटेवाडी, ता. २३ : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या आषाढ पालखी सोहळ्यामध्ये टाळ, मृदंग, वीणा आणि अखंड चालणारा नामघोष यांचा भक्तिमय नाद हा वारीचा आत्मा आहे. ही पारंपरिक वाद्ये वारकऱ्यांच्या भक्तीला सूर देतात आणि पालखी मार्गावर आध्यात्मिक वातावरण निर्मिती करतात. मात्र, काही ठिकाणी पालखीच्या स्वागतासाठी लावण्यात येणाऱ्या डीजे आणि मोठ्या साउंड सिस्टीममुळे हा मंगलमय नाद दबला जात आहे. यामुळे वारकऱ्यांमध्ये नाराजी आहे. पालखीचे स्वागत साध्या पद्धतीने, लेझीम, टाळ, मृदंग आणि वीणेच्या भक्तिमय नादात करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
टाळ, मृदंग आणि वीणा ही वाद्ये आषाढ वारीच्या परंपरेचा अविभाज्य भाग आहेत. टाळ आणि त्याचा ताल वारकऱ्यांच्या भजनांना आणि अभंगांना गती देतो, तर मृदंगाचा खोल, नादमय आवाज भक्तीच्या भावनेला अंत:करणापर्यंत साद घालतो. वीणा, एकतारी वाद्य आहे, जी अभंगांना सूरबद्ध करते. ही वाद्ये केवळ संगीतमय नाहीत, तर ती वारकऱ्यांच्या श्रद्धेचे प्रतीक आहेत, जी पिढ्यानपिढ्या चालत आली आहेत. या वाद्यांच्या नादातून संतांच्या भक्तीचा आणि त्यागाचा संदेश पालखी मार्गावर पसरतो. दोन वर्षांपूर्वी पालखी मार्गावर डीजे आणि साउंड सिस्टीमचा प्रचंड दणदणाट ऐकू येत असे. यामुळे वारकऱ्यांना भजन, अभंग, काकडा, मंगलचरण आणि हरिपाठ गायन थांबवावे लागत होते. प्रशासनाने यावर काही प्रमाणात नियंत्रण आणले असले, तरी पूर्णपणे बंदी आलेली नाही. यामुळे पालखी सोहळ्याच्या पावित्र्याला आणि शांतीला बाधा येत आहे.
परंपरेचा सन्मान हवा
पुणे शहरातून ग्रामीण भागात प्रवेश केलेल्या या पालखी सोहळ्यामध्ये वारकरी पहाटे भजने, अभंग आणि मंगलचरणाने वारीची सुरुवात करतात. याच वेळी स्थानिक मंडळे, संस्था, उद्योजक आणि राजकीय नेते पालखीचे स्वागत करतात. अनेक ठिकाणी मंडप टाकून सेवा दिली जाते; परंतु डीजे आणि साउंड सिस्टीमच्या कर्कश आवाजामुळे वारकऱ्यांचे भजन आणि अभंग दबले जातात. ‘आम्हाला आमच्या परंपरेचा सन्मान हवा आहे. डीजे बंद करून टाळ, मृदंग, वीणा आणि लेझीमच्या तालावर स्वागत करावे.’’ अशी भावना वारकरी व्यक्त करत आहेत. वारकऱ्यांनी प्रशासनाकडे डीजे आणि साउंड सिस्टीमवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे.
पालखी सोहळ्यातील टाळ, मृदंग, वीणा आणि अखंड होणारा नामघोष हा ‘लाऊनी मृदंग, स्मृती टाळघोष सेऊ ब्रह्मरस आवडीने’ हे ऐकणे म्हणजे ब्रह्मरसाचे सेवन आहे. शहरी भागामध्ये डीजे आणि साउंड सिस्टिम चा आवाज कमी होता. ८० टक्के या पद्धतीचे स्वागत आता बंद झाले आहे. मात्र काही ठिकाणी अजूनही अशा पद्धतीने मोठमोठ्या आवाजात कर्णकर्कश आवाजामध्ये स्वागत केले जाते. आम्ही त्या भाविकांची देखील भावना समजू शकतो. मात्र, डीजेचा होणारा मोठा आवाज त्रासदायक आहे. त्याचा अतिरेक नको.
- भानुदास महाराज मोरे, सोहळा प्रमुख, संत तुकाराम महाराज पालखी
पहाटे आमचे नित्याचे अभंग सुरू होतात. वारीदरम्यान विविध उपक्रम स्थानिक तसेच संस्थांकडून राबवले जातात. त्यांची भावना आम्ही समजू शकतो. मात्र, आपल्या कार्यक्रम ठिकाणी सुरू असणाऱ्या डीजेचा आवाज कमी ठेवला तर वारकऱ्यांना देखील भजन, अभंग गायनाचा आनंद घेता येईल. मागील काही वर्षांपेक्षा आता यामध्ये बरीच सुधारणा झाली आहे. प्रशासन ही त्यांच्या पद्धतीने योग्य काम करत आहे. मात्र तरीही काहीजण स्वागत उत्साहाच्या भरामध्ये डीजे आणि साउंड सिस्टिम लावतात.
- केशव महाराज मुळीक, तुकाराम महाराज पालखी सोहळा, दिंडी क्रमांक ९४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.