पशुधनासाठी संतुलित आहार महत्त्वाचा : पोळ
काटेवाडी, ता. २४ : पावसाळ्यात संकरित गाई आणि म्हशींच्या आरोग्यासाठी स्वच्छता, संतुलित आहार आणि प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे आहेत. चारा हवेशीर ठेवावा. त्यामध्ये बुरशी वाढणार नाही याची काळजी घ्यावी. बहुतांश वेळा चारा एकावर एक रुचून ठेवल्यानंतर आद्रतेमुळे त्यामध्ये बुरशी वाढते. अशाच चाऱ्यापासून जनावरांना विषबाधा होऊ शकते, असे मत बारामती तालुका पशुसंवर्धन अधिकारी डी. आर. पोळ यांनी व्यक्त केले.
पावसाळ्याच्या आगमनाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी या ऋतूत संकरित गाई आणि म्हशींच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. ओलसर वातावरणामुळे जिवाणू आणि विषाणूंचा प्रादुर्भाव वाढतो, ज्यामुळे जनावरांना विविध आजारांचा धोका संभवतो. योग्य आहार, गोठ्याचे व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक उपायांद्वारे या आजारांवर नियंत्रण ठेवता येते, ज्यामुळे दूध उत्पादनात सातत्य राखले जाऊ शकते, असे पोळ यांनी सांगितले.
पावसाळ्यातील आर्द्रता आणि ओलसरपणा संकरित गाई आणि म्हशींसाठी आव्हानात्मक ठरतो. या काळात घटसर्प, फऱ्या, खुरांचे आजार, कासदाह आणि पोटाचे विकार यांसारखे आजार पसरण्याची शक्यता असते. कासदाहामुळे सड सुजते आणि दूध उत्पादन घटते.
दूध उत्पादनावर परिणाम
पावसाळ्यातील आजारांचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होतो. कासदाह आणि पोटाचे विकार यामुळे दूध उत्पादन २० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकंते. योग्य व्यवस्थापन आणि वेळीच उपचार केल्यास हे नुकसान टाळता येत आहे.
प्रतिबंधात्मक उपाय
१. आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी गोठ्याची स्वच्छता महत्त्वाची
२. गोठा कोरडा, दरवाजे-खिडक्या उघड्या ठेवून हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा.
३. आठवड्यातून एकदा गोठ्यात जंतुनाशकाची फवारणी, भिंतींवर चुन्याचा थर द्यावा.
४. पावसाळ्यापूर्वी घटसर्प लसीकरण आणि नियमित जंतूनाशक देणे आवश्यक आहे.
५. बाधित जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे
आहार व्यवस्थापन
१. पावसाळ्यात दुधाळ जनावरांना संतुलित आहार देणे गरजेचे
२. जास्त हिरवा चारा टाळावा, कारण यामुळे मायांग बाहेर पडण्याचे प्रमाण वाढते.
३. हिरवा चारा, वाळलेला चारा आणि खुराक यांचे योग्य मिश्रण द्यावे.
४. आहारात कॅल्शिअम आणि स्फुरदाचे प्रमाण २:१ ठेवावे, चयापचयाचे आजार टाळता येतील.
५. स्वच्छ आणि ताजे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.