विदेशी रोपांच्या लागवडीमुळे जैवविविधता धोक्यात

विदेशी रोपांच्या लागवडीमुळे जैवविविधता धोक्यात

Published on

काटेवाडी, ता. २४ : बारामती परिसरात पावसाळ्यात वृक्षारोपणाचे उत्साहपूर्ण कार्यक्रम जोरात सुरू असतात. मात्र, ग्लिरिसीडिया आणि युकॅलिप्टससारख्या विदेशी झाडांच्या बेसुमार लागवडीमुळे माळरानावरील जैवविविधता आणि चिंकारा हरणांचे नैसर्गिक अधिवास संकटात सापडले आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, स्थानिक वनस्पतींच्या लागवडीला प्राधान्य देऊनच हे नुकसान टाळता येईल, असे मत पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

विदेशी प्रजातींची झाडे स्थानिक पर्यावरणाशी जुळवून घेत नाहीत. ती मातीतील पाणी आणि पोषक तत्त्वे मोठ्या प्रमाणात शोषून घेतात, ज्यामुळे गवताळ मैदाने आणि काटेरी झुडपे नष्ट होत आहेत. याचा थेट परिणाम चिंकारा हरणांसह माळरानावरील जैवविविधतेवर होतो. युकॅलिप्टससारख्या झाडांमुळे परागकण कीटक, पक्षी आणि सरपटणारे प्राणी यांची अन्नसाखळी कोलमडते, ज्यामुळे पर्यावरणीय संतुलन बिघडते. विदेशी झाडांच्या दिखाऊ वृक्षारोपणाऐवजी स्थानिक झाडांची लागवड हाच यावर उपाय आहे.

चिंकारा आणि स्थानिक झाडांचे महत्त्व
भारतीय गझेल म्हणून ओळखले जाणारे चिंकारा हरण माळरानावरील कमी उंचीच्या काटेरी झुडपे आणि गवताळ मैदानांना पसंत करते. बाभूळ, बोर, हिवर, भोकर, खैर, चिंच, कडूनिंब, वड, पिंपळ, सिताफळ, शिरीष आणि उंबर यांसारखी स्थानिक झाडे चिंकारांना आहार, निवारा आणि संरक्षण देतात. ही झाडे कमी पाण्यावर तग धरतात, मातीची धूप रोखतात आणि परागकणाद्वारे जैवविविधता टिकवतात. याउलट, विदेशी झाडे चिंकारांसाठी निरुपयोगी असून, माळरानाच्या पर्यावरणावर विपरीत परिणाम करतात.

उपाय आणि जनजागृतीची गरज
माळरानांचे संरक्षण करण्यासाठी वृक्षारोपणात स्थानिक झाडांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. वन विभागाने चुकीच्या वृक्षारोपणावर कठोर कारवाई करावी आणि स्थानिक प्रजातींच्या लागवडीला प्रोत्साहन द्यावे. स्थानिक शेतकरी, पर्यावरणप्रेमी, स्वयंसेवी संस्था आणि शाळांनी देशी वनस्पतींचे महत्त्व समजून जनजागृती अभियान राबवावे. ग्रामपंचायती आणि शैक्षणिक संस्थांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा. स्थानिक वनस्पतींचे संवर्धन आणि संरक्षण हीच माळरान वाचवण्याची गुरुकिल्ली आहे.


विदेशी वृक्षारोपणामुळे केवळ चिंकाराच नव्हे, तर माळरानावरील संपूर्ण जैवविविधता धोक्यात आहे. बारामती परिसरात स्थानिक लोक, वन विभाग आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन देशी वनस्पतींच्या संवर्धनासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. माळरानांवरील वृक्षारोपणाचे दिखाऊ कार्यक्रम बंद करून निसर्गाला त्याचे काम करू द्यावे. स्थानिक झाडे तोडू नयेत आणि त्यांच्या जागी विदेशी झाडे लावू नयेत.
- - डॉ. महेश गायकवाड, पर्यावरण अभ्यासक, बारामती


माळरानावर पक्षी हेच सर्वात मोठे निसर्ग संवर्धक आहेत. पक्षांना आवडणारी स्थानिक जातीची झाडे लावल्यास त्याचा बीजप्रसार पक्षी मोठ्या प्रमाणात करतात. पक्षाच्या विशिष्टतेतून पडणाऱ्या बीजापासून निसर्गातच वृक्षारोपण होते. त्यामुळे स्थानिक प्रजातींनाच महत्त्व देणे गरजेचे आहे. विदेशी झाडे आपल्या पर्यावरणाला अनुकूल नाहीत. तसेच देशी झाडांमध्ये देखील स्थानिक प्रजातींचाच वृक्षारोपणासाठी वापर करावा.
- प्रशांत मुथा, निसर्ग मित्र, दौंड


प्राण्यांसाठी देशी वृक्षांचे महत्त्व
बाभूळ: कमी पाण्यावर तग धरणारी, पौष्टिक पाने आणि शेंगा देणारी, काटे शिकारी प्राण्यांपासून संरक्षण देतात.
बोर: रसाळ फळे चिंकारांसह पक्ष्यांना आहार देतात, परागीकरणासाठी उपयुक्त.
हिवर: कोरड्या वातावरणात सावली आणि निवारा प्रदान करते.
भोकर: फळे आणि पाने चिंकारांना आहार देतात, पक्ष्यांसाठीही उपयुक्त.
खैर: काटेरी स्वरूपामुळे संरक्षण, मातीची धूप रोखण्यास मदत.
चिंच: फळे आणि सावली चिंकारांसह इतर प्राण्यांना आधार.
कडूनिंब: कीटकनाशक गुणधर्म, परागण आणि अन्नसाखळीसाठी महत्त्वाचा.
वड आणि पिंपळ: सावली आणि फळे, पक्षी आणि लहान प्राण्यांसाठी निवारा.
कवट: फळे आणि काटेरी स्वरूप चिंकारांना अनुकूल.
शमी : माळरानावरील कोरड्या वातावरणात आहार आणि निवारा.
पटा: फुले परागकण कीटकांना आकर्षित करतात.
सीताफळ: गोड फळे चिंकारांसह इतर प्राण्यांना आकर्षित करतात.
उंबर: फळे आणि सावली, पक्षी आणि सस्तन प्राण्यांसाठी महत्त्वाचे.

----------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com