आडसाली ऊस लागवड नफ्याचा सौदा
काटेवाडी, ता. ३० : आडसाली ऊस लागवड शेतकऱ्यांसाठी नफ्याचा सौदा आहे आणि यशस्वी पिकासाठी बेणे प्रक्रिया हा खरा आधार आहे. ही सोपी, कमी खर्चाची पद्धत रोग आणि किडींना रोखते, खतांचा खर्च कमी करते आणि एकरी १५ ते २० टक्के जास्त उत्पन्न देते, असा विश्वास शेती तज्ज्ञांकडून व्यक्त केला आहे.
ऊस पिकावर काणी रोग, खवले कीड आणि पिठ्या ढेकूण यांचा हल्ला होऊ शकतो. यासाठी १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम आणि ३०० मिलिलिटर डायमिथोएट प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात बेणे १० मिनिटे बुडवल्यास हानिकारक जिवाणू आणि बुरशी नष्ट होतात. यामुळे बेण्याची उगवण ९० टक्क्यांपर्यंत वाढते आणि काणी रोगामुळे होणारे ३० टक्क्यांपर्यंत नुकसान टळते. खवले किडीपासून कांड्या सुरक्षित राहतात, ज्यामुळे पिकाची सुरुवातीची वाढ मजबूत होते. बेणे प्रक्रिया करण्यासाठी विशेष साधनांची गरज नाही. स्थानिक कृषी केंद्रातून कार्बेन्डाझिम, डायमिथोएट आणि जिवाणू खते सहज उपलब्ध होतात. लागवडीपूर्वी माती परीक्षण करून योग्य बेणे निवडावे आणि प्रक्रिया करावी. ही पद्धत अवलंबल्यास शेतकऱ्यांचे नुकसान टळते आणि नफा वाढतो. बेणे प्रक्रियेमध्ये वापरण्यात येणाऱ्या बुरशीनाशक व कीटकनाशकांचे प्रमाण हेक्टरी व एकरी बदलत असते त्यामुळे हे प्रमाण तज्ञांच्या सल्ल्याने घ्यावे.
----------------------------------
अडसाली ऊस लागवडीसाठी बेणे प्रक्रियेचे फायदे
१. रोग आणि किडींवर नियंत्रण: कार्बेन्डाझिम (१०० ग्रॅम) आणि डायमिथोएट (३०० मिलिलिटर) प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून बेणे १० मिनिटे भिजवल्यास काणी रोग, खवले कीड आणि पिठ्या ढेकूण यांचा नायनाट होतो. यामुळे बेण्याची उगवण ९० टक्क्यांपर्यंत वाढते आणि २५-३० टक्के नुकसान टळते.
२. खतांची बचत: अॅसिटोबॅक्टर (१० किलो) आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत (१.२५ किलो) १०० लिटर पाण्यात मिसळून टिपरी ३० मिनिटे भिजवल्यास ५० टक्के नत्र आणि २५ टक्के स्फुरदयुक्त खतांची बचत होते. यामुळे शेतकऱ्यांचा खतांवरील खर्च ३०-४० टक्क्यांनी कमी होतो.
३. उत्पादनात वाढ: बेणे प्रक्रियेमुळे एकरी १०० ते १२० टन ऊस उत्पादन मिळू शकते. निरोगी बेण्यामुळे फुटव्यांची संख्या आणि कांड्यांची जाडी वाढते, ज्यामुळे बाजारात चांगला भाव (प्रति टन २५००-३००० रुपये) मिळतो.
४. सोपी आणि कमी खर्चाची पद्धत: बेणे प्रक्रिया साध्या पद्धतीने करता येते आणि यासाठी विशेष साधनांची गरज नाही. कार्बेन्डाझिम, डायमिथोएट आणि जिवाणू खते स्थानिक कृषी केंद्रात सहज उपलब्ध असतात.
५. मुळांची जलद वाढ: जिवाणू खत प्रक्रियेमुळे पिकाच्या मुळांची वाढ जलद होते, आणि पोषक द्रव्ये कार्यक्षमतेने शोषली जातात. ह्युमिक ऍसिड मुळे पिकाची सुरुवातीची वाढ मजबूत होते.
ऊस उगवून आल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये नत्रयुक्त व स्फुरदयुक्त खते उपलब्ध करून देण्याचे काम हे जिवाणू करत असतात. याची खूप महत्त्वाची भूमिका आहे. ५० टक्के नत्राची व २५ टक्के स्फुरद ची मात्रा ही बीजप्रक्रियेमुळे कमी होते, अशी विद्यापीठाची शिफारस आहे. त्यामुळे बेणे प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. बेणे प्रक्रियेचे सकारात्मक परिणाम देखील खुप चांगले आहेत. बेणे प्रक्रियेमुळे पिकांची वाढ चांगली होते. कीड व रोग नियंत्रणासाठी जिवाणूसंवर्धक बेणे प्रक्रिया गरजेची आहे.
- डॉ. भारत रासकर, सल्लागार व ऊस विशेषज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.