ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका
काटेवाडी, ता. ३ : मे महिन्यात मुसळधार पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ऊस पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. हुमणी भुंगेरांनी घातलेल्या अंड्यांमधून आता अळ्या बाहेर येत आहेत. नव्याने केलेल्या आडसाली ऊस लागवडीवर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. अळी पिकांच्या मुळांना खात असल्याने पिके वाळतात. ज्यामुळे शेतकऱ्यांना पुनर्लागवड करावी लागते. आणि आर्थिक नुकसान होते. यंदा हुमणीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच प्रभावी उपाययोजना करावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे.
हुमणी अळी ऊस, मका, सोयाबीन, भुईमूग यांसारख्या पिकांच्या मुळांना खाते, ज्यामुळे पिकांचे पाणी आणि अन्न शोषण थांबते. परिणामी, पाने पिवळी पडतात आणि १५-२० दिवसांत पीक पूर्णपणे वाळते. बारामती आणि इंदापूर तालुक्यांमध्ये हुमणीचा प्रादुर्भाव गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. यामुळे पिकांचे ३० ते ८० टक्के नुकसान होऊ शकते. दुबार लागणीमुळे शेतकऱ्यांना बियाणे, खत, मजुरी आणि पाण्याचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागतो, ज्यामुळे त्यांचे आर्थिक संकट वाढते. शेतकऱ्यांनी मे-जून महिन्यांत भुंगेरांचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जुलै-नोव्हेंबर या काळात अळ्यांवर नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात. हुमणीमुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सामुदायिक प्रयत्न आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधून योग्य मार्गदर्शन घ्यावे, जेणेकरून आडसाली ऊस लागवडीचे नुकसान टाळता येईल आणि दुबार लागणीची वेळ येणार नाही.
परोपजीवी बुरशी व नैसर्गिक शत्रूंचा करा वापर
बुरशी-आधारित नियंत्रक: बिव्हेरिया बॅसियाना, मेटारायझीयम अॅनिसोप्ली आणि व्हर्टिसिलीयम लेकॅनी या बुरशी हुमणी अळी आणि भुंगेरांच्या शरीरात प्रवेश करून त्यांना कार्यहीन करतात. या बुरशी ८-१० किलो प्रतिएकर शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून, ड्रिपद्वारे किंवा ड्रेंचिंग पद्धतीने पिकाच्या मुळांजवळ द्याव्यात.
नैसर्गिक शत्रू: जिवाणू (बॅसिलस पॅपीली) आणि सूत्रकृमी (हेटेरोरॅब्डीटीस) हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. हे सूक्ष्मजीव हुमणीच्या अळ्या आणि भुंगेरांना नष्ट करतात. ईपीएन (एटोमो पॅथोजेनिक निमटोड) १ लिटर प्रति एकर २०० लिटर पाण्यात मिसळून जमीन ओलसर असताना बेटाजवळ आळवणी करावी. यामुळे जमिनीतील उपयुक्त जिवाणूंवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.
रासायनिक कीटकनाशकांचा वापर प्रभावी
१) क्लोरपायरीफॉस: १ लिटर क्लोरपायरीफॉस (२० टक्के ईसी) ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रतिएकर नोझल काढलेल्या पंपाने सरीत आळवणी करावी.
२) संयुक्त कीटकनाशक: फिप्रोनिल (४०टक्के) + इमिडाक्लोप्रिड (४० टक्के डब्ल्यूजी) २०० ग्रॅम प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून उसाच्या ओळीत ड्रेंचिंग करावी.
३) प्रतिबंधात्मक उपाय: लागवडीवेळी फिप्रोनिल (३ टक्के दाणेदार) ३३ किलो प्रति हेक्टर मातीत मिसळावे.
असा करा प्रतिबंधात्मक उपाय
सापळा पिके: ताग, एरंडी किंवा भुईमूग यांसारखी सापळा पिके उसाच्या सरीत ठिकठिकाणी लावावीत. या पिकांखालील अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.
आंतरमशागत: शेतात नांगरणी किंवा खणखण करताना दिसणाऱ्या अळ्या हाताने गोळा करून नष्ट कराव्यात.
जैविक व रासायनिक पद्धतीने हुमणीचे नियंत्रण करता येऊ शकते.
शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये असलेला प्रादुर्भावाचे प्रमाण लक्षात घेता यापैकी कोणतेही पद्धत निवडून हुमणीचे नियंत्रण करावे.
- के. एन. हिंगमिरे, शेतकी अधिकारी, कर्मयोगी सहकारी साखर कारखाना
28218
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.