
काटेवाडी, ता. २१ : राज्यातील हजारो शेतकरी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, शास्त्रज्ञ व संशोधकांशी थेट डिजिटली जोडले जात आहेत. कृषी विभाग, पाणी फाउंडेशन आणि राज्यातील पाच प्रतिष्ठित कृषी विद्यापीठांच्या सहकार्याने आयोजित डिजिटल शेती शाळांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान आणि थेट तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे. या विद्यापीठांतील शास्त्रज्ञ आणि संशोधकांच्या योगदानामुळे शेतकऱ्यांना अत्याधुनिक ज्ञान तर मिळत आहेच तसेच समस्यांचे निराकरण देखील होत आहे.
पूर्वी गावोगावी पारंपरिक शेती शाळा आयोजित होत असत, जिथे स्थानिक तज्ज्ञ किंवा कृषी अधिकारी मर्यादित संसाधनांसह मार्गदर्शन करत. मात्र, आता डिजिटल शेती शाळांमुळे शेतकरी झूम मीटिंगद्वारे थेट कृषी विद्यापीठांतील शास्त्रज्ञ आणि संशोधकांशी जोडले गेले आहेत. या शाळा दररोज संध्याकाळी ६:१५ किंवा ७:३० वाजता आयोजित केल्या जातात, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या सोयीने सहभागी होता येते. मे २०२५ पासून राज्यभरात ७२ डिजिटल शेती शाळा यशस्वीपणे पार पडल्या आहेत. प्रत्येक शाळेत सुमारे ३०० ते १००० शेतकरी सहभागी होतात, जे कडधान्य, तृणधान्य आणि नगदी पिकांसह ३६ प्रकारच्या पिकांबाबत मार्गदर्शन घेतात. मृदा व्यवस्थापन, पीक संवर्धन, रोग नियंत्रण, बियाणे निवड, बीज प्रक्रिया आणि पेरणीतील रोपांमधील योग्य अंतर यांसारख्या विषयांवर सखोल चर्चा होते. हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे थेट मार्गदर्शन मिळते. डिजिटल शेती शाळांनी शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक शेती पद्धतींबाबतही मार्गदर्शन केले आहे. सेंद्रिय खतांचा वापर, पाण्याचा कार्यक्षम वापर आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन यांसारख्या पद्धतींवर भर दिला जातो. यामुळे शेतकऱ्यांना केवळ उत्पादन वाढवता येत नाही, तर पर्यावरणाचे संरक्षणही करता येते.
कृषी विद्यापीठांचे महत्त्वपूर्ण योगदान...
उपक्रमाला राज्यातील पाच प्रतिष्ठित कृषी विद्यापीठांचे सहकार्य लाभले आहे: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला), डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली), महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) आणि विलासराव देशमुख कृषी विद्यापीठ (लातूर). या विद्यापीठांतील शास्त्रज्ञ आणि संशोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देतात. प्रमाणित बियाणे, औषधे आणि त्यांच्या योग्य वापराबाबत सविस्तर माहिती दिली जाते.
सोशल मीडियाचा प्रभावी वापर...
बारामती तालुक्यात सर्व सरपंचांचा एक व्हाट्सअप ग्रुप आणि गावनिहाय, पीकनिहाय शेतकऱ्यांचे स्वतंत्र ग्रुप तयार केले आहेत. या ग्रुप्सवर डिजिटल शेती शाळेच्या लिंक पाठवल्या जातात, ज्यामुळे कोणताही शेतकरी सहज सहभागी होऊ शकतो. सोशल मीडिया आणि व्हाट्सअपद्वारे या शाळांची माहिती प्रसारित केली जाते, ज्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत माहिती त्वरित पोहोचते. पुढील वर्षात आणखी डिजिटल शेती शाळा आयोजित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ड्रोन तंत्रज्ञानावर आधारित शेती, तसेच स्मार्ट इरिगेशन यासारख्या नव्या विषयांचा समावेश असेल. यामुळे शेतकऱ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी अधिक सक्षम बनवले जाईल.
डिजिटल शेती शाळांनी शेतकऱ्यांना केवळ तांत्रिक ज्ञानच दिले नाही, तर त्यांचा आत्मविश्वासही वाढवला आहे. आधुनिक शेतीच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी हा उपक्रम शेतकऱ्यांना सक्षम करत आहे. शास्त्रज्ञ आणि संशोधक शेतकऱ्यांशी थेट जोडले गेल्यामुळे स्थानिक पातळीवरील समस्या सुद्धा समजण्यास सोयीचे ठरत आहे.
- पृथ्वीराज लाड, समन्वयक, पाणी फाउंडेशन बारामती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.