द्राक्ष बागांना डाऊनी, करपाचा विळखा

द्राक्ष बागांना डाऊनी, करपाचा विळखा

Published on

काटेवाडी, ता. ५ : बारामती-इंदापूर तालुक्यातील द्राक्ष बागांवर सततच्या हवामान बदलामुळे डाऊनी मिल्ड्यू, भुरी, करपा, तांबेरा आणि जिवाणूजन्य करपा या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ढगाळ वातावरण, जास्त आर्द्रता आणि वारंवार बदलणारे तापमान यामुळे उत्पादक संकटात सापडले आहेत.

सध्या मालकाडी तयार करणे आणि काही ठिकाणी मालछटणीच्या कामांना सुरुवात झाली असताना, रोग नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. जून-जुलै महिन्यातील सततच्या ढगाळ हवामानामुळे आणि हलक्या ते मध्यम पावसानंतर येणाऱ्या कडक ऊनामुळे द्राक्ष बागांमध्ये ओलावा आणि उष्णता टिकून राहते. यामुळे डाऊनी मिल्ड्यू आणि भूरीसारख्या बुरशीजन्य रोगांना पोषक वातावरण मिळते. पानांवर ओलावा साचणे आणि उष्णतेमुळे बुरशी व जिवाणूंचा प्रसार झपाट्याने होत आहे. याचा परिणाम कोवळ्या फुटी आणि पानांवर होऊन उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, सध्या मालकाडी आणि मालछटणीच्या कामांदरम्यान नियमित बाग पाहणी आणि योग्य वेळी फवारणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.


रोग आणि उपाययोजना....
डाऊनी मिल्ड्यू: १७-२८ अंश सेल्सिअस तापमान आणि ४०% पेक्षा जास्त आर्द्रतेत हा रोग पसरतो. पानांवर पिवळे किंवा लाल डाग आणि खालच्या बाजूस पांढरे भुकटीसारखे आवरण दिसते. तज्ज्ञांनी कॅनोपी मोकळी ठेवण्यासाठी बगलफुटी काढण्याचा आणि पोटॅशिअम सॉल्ट फॉस्फरस ॲसिड (४ ग्रॅम) अधिक मॅन्कोझेब (२ ग्रॅम) किंवा प्रोपीनेब (३ ग्रॅम) प्रति लिटर पाण्यात फवारणीचा सल्ला दिला आहे.
भूरी (पावडरी मिल्ड्यू): २०-२७ अंश सेल्सिअस आणि ६०% पेक्षा जास्त आर्द्रतेत हा रोग दाट कॅनोपीत वाढतो. पानांवर काळसर-भुरकट डाग दिसतात, ज्यामुळे पानगळ आणि काडी परिपक्वता लांबते. मोकळी कॅनोपी ठेवणे, नत्राचा वापर थांबवणे आणि सल्फर (२-२.५ ग्रॅम) किंवा हेक्झाकोनॅझोल (१ मि.ली./लिटर) फवारावे.
करपा (ॲन्थ्रॅक्नोज): उष्ण, ओलसर वातावरणात कोवळ्या फुटींवर पिवळसर-तपकिरी डाग आणि छिद्रे दिसतात. थायोफिनेट मिथाईल (१ ग्रॅम/लिटर) किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड (२.५ ग्रॅम/लिटर) फवारणी प्रभावी ठरते.
तांबेरा (रस्ट): जुन्या पानांवर पिवळे-नारिंगी भुकटीसारखे आवरण दिसते. बोर्डो मिश्रण (१ टक्के) किंवा कॉपर हायड्रॉक्साईड (२.५-३ ग्रॅम/लिटर) वापरावे.
जिवाणूजन्य करपा: झांथोमोनास सिट्री व्हिटीकोलामुळे पानांवर डाग पडतात आणि फुटींची वाढ खुंटते. मॅन्कोझेब (२-२.५ ग्रॅम/लिटर) किंवा कासूगामायसीन अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड (७५० ग्रॅम/हेक्टर) फवारावे.

सध्या हवामान सतत बदलत असल्याने द्राक्षबागामध्ये आद्रतेचे प्रमाण ८० ते १०० टक्के आहे. तसेच तापमान ३०० ते ३२ डिग्रीपर्यंत राहत आहे. अशा वातावरणामुळे वेलीची शाकीय वाढ आणि बगल फुटी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे झाडावर शाखांची गर्दी दिसून येते. असे रोगासाठी पोषक असते. त्यामुळे सध्या डाऊनी करपा असे रोग द्राक्ष बागांमध्ये दिसून येत आहे. खास करून नवीन कोवळ्या फुटींवर डाऊनीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
- डॉ. आर. जी. सोमकुंवर, संशोधक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी
01058

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com