‘मेघदूत-दामिनी’ शेतकऱ्यांचा डिजिटल सल्लागार

‘मेघदूत-दामिनी’ शेतकऱ्यांचा डिजिटल सल्लागार

Published on

काटेवाडी, ता. ४ : शेतकऱ्यांना हवामान अंदाज, मेघगर्जना आणि विजेच्या पूर्वानुमानासह कृषी सल्ला देण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाने विकसित केलेल्या मेघदूत आणि दामिनी या मोबाईल अॅप्सचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. शेतीच्या महत्त्वपूर्ण निर्णयांसाठी हे अॅप्स शेतकऱ्यांसाठी विश्वसनीय सहाय्यक ठरत आहेत. या अॅप्सद्वारे स्थानिक आणि अचूक माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान टाळता येईल.

मेघदूत अॅप शेतीसाठी डिजिटल मार्गदर्शक
मेघदूत अॅप भारतीय हवामानशास्त्र विभाग, भारतीय कृषी संशोधन परिषद आणि पुण्यातील भारतीय उष्णदेशीय हवामान संशोधन संस्था यांच्यावतीने विकसित केले आहे. हे अॅप स्थानिक पातळीवरील हवामान अंदाज, तापमान, पर्जन्य, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा याची माहिती पुरवते. याशिवाय, पिकांच्या नियोजनासाठी पेरणी, सिंचन, खतांचा वापर आणि कीड व्यवस्थापन याबाबत शास्त्रीय सल्ला मराठी, हिंदी, इंग्रजीसह आठ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी नवीन सल्ला या अॅपद्वारे दिला जातो, ज्यामुळे शेतकरी योग्य नियोजन करून नुकसान टाळू शकतात. मेघदूतमुळे शेतकऱ्यांना कृषी केंद्रांवर जाण्याची गरज कमी झाली आहे, ज्यामुळे वेळ आणि खर्च वाचतो. मराठी भाषेतील सोप्या माहितीमुळे ग्रामीण शेतकऱ्यांना हे अॅप वापरणे सुलभ आहे. अचूक हवामान अंदाजामुळे पेरणी आणि कापणीचे नियोजन सुकर होते, तर खत आणि कीटकनाशकांचा योग्य सल्ला अनावश्यक खर्च टाळण्यास मदत करतो.

दामिनी अॅप; विजेपासून संरक्षण
दामिनी अॅप हे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत पुण्यातील भारतीय उष्णदेशीय हवामान संशोधन संस्थेने विकसित केले आहे. हे अॅप मेघगर्जना आणि विजेच्या पूर्वानुमानासाठी तयार करण्यात आले आहे. वीज पडण्याची शक्यता, स्थान आणि वेळ याची अचूक माहिती शेतकऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना मिळते. यामुळे पिकांचे आणि शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळता येते.

मेघदूत आणि दामिनी अॅप्स
शेतकऱ्यांना पुरवितात माहिती

हवामान अंदाज : स्थानिक तापमान, पर्जन्य, आर्द्रता आणि वाऱ्याची माहिती.
कृषी सल्ला: पेरणी, सिंचन, खतांचा वापर, कीड व्यवस्थापन आणि रोगनिदान.
मेघगर्जना आणि वीज: विजेच्या संभाव्यतेची माहिती आणि सावधगिरीच्या सूचना.
बाजारभाव: शेतमालाचे बाजारातील दर आणि विक्रीसाठी योग्य वेळेचे नियोजन.
व्हिडिओ मार्गदर्शन: जैविक शेती आणि नवीन तंत्रज्ञानासाठी ऑडिओ-व्हिडिओ मार्गदर्शन.

अॅप डाऊनलोड आणि वापर
दोन्ही अॅप्स गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी मेघदूत आणि दामिनी अॅप्स डाऊनलोड करून नोंदणी करावी. नोंदणीनंतर, होम स्क्रीनवर हवामान अंदाज, बाजारभाव, चॅटबॉट आणि व्हिडिओ मार्गदर्शन असे पर्याय उपलब्ध होतात. मराठीतील सोप्या सूचना आणि स्थानिक माहितीमुळे हे अॅप्स शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com