छत्रपती कारखाना करणार ‘एआय’चा वापर

छत्रपती कारखाना करणार ‘एआय’चा वापर

Published on

काटेवाडी, ता. ६ ः भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती कारखान्याच्या वतीने ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरण्याची नवी योजना जाहीर केली आहे. यामुळे ऊस उत्पादन ३० ते ४० टक्क्यांनी वाढेल आणि पाणी, तसेच खतांची बचत होईल. ही योजना अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्यातील करारामुळे शक्य झाली आहे.
या योजनेसाठी वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती, राज्य साखर संघ, मुंबई आणि साखर कारखाने एकत्र काम करणार आहेत. यासंदर्भातील कराराचा मसुदा व्हीएसआयने तयार केला आहे. या योजनेत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा खर्च प्रति हेक्टर २५ हजार रुपये आहे. ही योजना फक्त ६०० सभासदांसाठी असून, सहभागासाठी अंतिम मुदत १५ जुलै आहे. प्रथम पैसे भरून सहभाग नोंदविणाऱ्या सभासदांना प्राधान्य देण्यात येणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि उपाध्यक्ष कैलास रामचंद्र गावडे यांनी सभासदांना या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी सभासदांनी कारखान्याच्या ऊस विकास विभागाशी संपर्क साधावा. या योजनेद्वारे सभासदांनी ऊस उत्पादन वाढवून कारखान्याच्या ऊस गाळप वाढीसाठी सहकार्य करावे, अशी विनंती संचालक मंडळाने केली आहे.

सहभागी सभासदांना खालील अटी पूर्ण कराव्या लागतील:
सभासदांनी ९००० रुपये कारखान्याच्या लेखा परिक्षण विभागाकडे जमा करावेत आणि पावती ऊस विकास विभागाकडे नोंदवावी.
ऊस लागवडीसाठी ड्रिप इरिगेशनचा वापर बंधनकारक आहे.
रोपांची लागवड केल्यास ऊस उत्पादन वाढण्यास मदत होईल.

रकमेची विभागणी
आर्थिक सहभाग रक्कम (रुपये)
सहभागी सभासद ९०००
कारखाना ६,७५०
व्हीएसआय पुणे ९,२५०
एकूण २५,०००

Marathi News Esakal
www.esakal.com