वेलवर्गीय फळभाज्यांवर किडींचा प्रादुर्भाव
काटेवाडी, ता. ९ : जिल्ह्यात वेलवर्गीय फळभाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, या पिकांवर रसशोषक कीडी, नागअळी, गोगलगाय मावा, तुडतुडे, पांढरी माशी यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पीक अवस्थेनुसार सापळा पिके आणि जैविक बुरशीनाशके यांचा योग्य वापर केल्यास किडींचे प्रभावी नियंत्रण शक्य आहे, तर गरज पडल्यास रासायनिक कीटकनाशकांचा काळजीपूर्वक उपयोग करता येतो, असे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले
रसशोषक कीडी जसे की मावा, फुलकिडे आणि पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव पालेभाज्यांवर लवकर दिसून येतो. यासाठी जैविक पद्धतींमध्ये सापळा पिकांचा वापर प्रभावी ठरतो. सापळा पिके जसे की झेंडू किंवा मका यांची लागवड मुख्य पिकाच्या आसपास केल्यास किडींचे लक्ष विचलित होते आणि मुख्य पिकाचे नुकसान कमी होते. याशिवाय, ट्रायकोग्रामा सारख्या परोपजीवी कीटकांचा वापर केल्यास रसशोषक किडींच्या अंड्यांचा नाश होऊन त्यांची संख्या नियंत्रित राहते.
नागअळी: ओळख आणि नियंत्रण
वेलवर्गीय पिकांवर नागअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो. ही अळी पाने आणि फळे पोखरून पिकाचे मोठे नुकसान करते. सापळा पिके आणि नियमित पिकाची तपासणी यामुळे नागअळीचा प्रादुर्भाव लवकर ओळखता येतो आणि जैविक नियंत्रण अधिक प्रभावी होते.
गोगलगाय: पर्यावरणपूरक उपाय
पावसाळी हवामानात गोगलगाय पालेभाज्यांच्या पानांना आणि कोवळ्या कोंबांना हानी पोहोचवतात. याशिवाय, शेतात सेंद्रिय खतांचा योग्य वापर आणि पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवल्यास गोगलगायचा प्रादुर्भाव कमी होतो.
वणी कीड: कापूस आणि सोयाबीनसह पालेभाज्यांचे शत्रू आहे. पैसा कीड (वाणी) ही कापूस आणि सोयाबीनसह गवार यांसारख्या पालेभाज्यांवरही हल्ला करते. ही कीड पिकाच्या मुळांना आणि खोडाला नुकसान पोहोचवते. तसेच, पिकांची फेरपालट आणि सेंद्रिय खतांचा वापर यामुळे या किडीचा प्रसार कमी होतो.
कोंब फुटल्यानंतर पहिल्या अवस्थेमध्ये असल्यावर गोगलगाय, वाणी, नागतोडे यांचा प्रादुर्भाव अशा पिकांवर दिसून येत आहे. नीरा डावा कालवा आणि त्याच्या वितरिका तसेच उजनी धरण नदीचा पट्टा या भागामध्ये या किडी अधिक प्रमाणात दिसतात. तर पालेभाज्यांमध्ये नागअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक किडीनुसार फवारणी करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी अर्क किंवा न्यू अर्क याची जर फवारणी केली तर यामध्ये रससोशक्ती तसेच पान खाणारी अळी व किडी यांचादेखील बंदोबस्त होतो.
- डॉ. मिलिंद जोशी, पीक संरक्षण तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र बारामती