खरिपात मिळवा तणांनावर वेळीच नियंत्रण
काटेवाडी, ता. १० : समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या लवकर सुरू झाले आहेत. परिणामी शेतकऱ्यांना पिकांमध्ये तणांचा देखील उपद्रव वाढू लागला आहे. खरीप हंगामातील मका, कापूस, सोयाबीन आणि भात पिकांमध्ये तणांचे वेळीच नियंत्रण न केल्यास उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.
पीकवाढीच्या सुरुवातीच्या काळात तणनियंत्रण आणि आंतरमशागतीवर विशेष लक्ष देण्याचे आवाहन विभागाने केले आहे. यामध्ये पारंपरिक खुरपणी, कोळपणी तसेच तणनाशकांचा योग्य वापर यावर भर देण्यात आला आहे. प्रत्येक पिकासाठी विशिष्ट तणनियंत्रण पद्धती आणि संवेदनशील कालावधी निश्चित करण्यात आले असून, शेतकऱ्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपाययोजना कराव्यात, असेही सुचवण्यात आले आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना तणनाशकांचा वापर करण्यापूर्वी पीक पद्धती, तणांचा प्रकार, जमिनीचा प्रकार आणि हवामान यानुसार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे तणनाशकांचा प्रभावी वापर होऊन उत्पादनवाढ शक्य होईल.
मकामध्ये तणनियंत्रण आणि आंतरमशागत
मका पिकात तणनियंत्रणासाठी पीकवाढीच्या सुरुवातीच्या काळात एक ते दोन खुरपण्या करून ताटांना आधारासाठी माती चढवावी. गरजेनुसार एक ते दोन कोळपण्या कराव्यात. मजुरांची कमतरता किंवा पावसामुळे कोळपणी शक्य नसल्यास, पेरणीनंतर परंतु उगवणीपूर्वी अट्रॅझीन (५० डब्ल्यूपी) १.५ ते ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पिक २५ ते ३० दिवसांचे असताना हॅलोसल्फुरॉन मिथाईल (७५ डब्ल्यूपी) ०.२४ ग्रॅम किंवा ३० ते ४० दिवसांचे असताना टेम्बोट्रायॉन (३४.४ एससी) ०.६ मि.लि. किंवा टोप्रामेझॉन (३३.६ एससी) ०.१५ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल वापरावे.
कापसातील तणांचा संवेदनशील कालावधी
कापूस पिकात तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी २० ते ६० दिवसांचा आहे. या काळात तण नियंत्रण न झाल्यास उत्पादनात मोठी घट येते. सुरुवातीच्या ९ आठवड्यांपर्यंत पीक तणमुक्त ठेवणे आवश्यक आहे. यासाठी दोनवेळा निंदणी आणि तीन ते चार वखरण्या किंवा डवरण्या कराव्यात. मजुरांची अनुपलब्धता किंवा जास्त खर्च टाळण्यासाठी पेंडीमेथलीन (३८.७ सीएस) ३ ते ३.५ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर लगेच फवारावे. किंवा पिक २०-३० दिवसांचे असताना पायरीथायोबॅक सोडिअम (६ टक्के) + क्विझालोफॉप इथाईल (४ टक्के ईसी) २ ते २.५ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात फवारावे. फवारणीनंतर ५-१० दिवस डवरणी करू नये.
घट टाळण्यासाठी उपाय....
सोयाबीन पिकात तणांचे वेळीच नियंत्रण न केल्यास ३० ते ४० टक्के पर्यंत उत्पादनात घट येते. पीक १५ ते २० आणि २५ ते ३० दिवसांचे असताना अनुक्रमे पहिली आणि दुसरी कोळपणी करावी. फुलोऱ्याच्या अवस्थेत कोळपणी टाळावी, कारण यामुळे मुळांना नुकसान होऊ शकते. तणनाशकांचा पर्याय म्हणून पेंडीमिथलीन (३८.७ सीएस) ३ ते ३.५ मि.लि., डायक्लोसुलम (८४ डब्ल्यूडीजी) ०.०४२ ग्रॅम किंवा सल्फेन्ट्राझॉन (३९.६ एससी) १.५ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून उगवणीपूर्वी फवारावे. तण दोन ते चार पानांच्या अवस्थेत असताना इमीझाथापायर (१० एसएल) १.५ ते २ मि.लि. किंवा इतर पर्यायांचा वापर करावा.
भात पिकासाठी चिखलणी आणि पुनर्लागवड
भात पिकात चिखलणी पारंपरिक पद्धतीने किंवा पॉवर टीलर/ट्रॅक्टरच्या साह्याने रोटॅव्हेटरने करावी. हळव्या जातींची
पुनर्लागवड २१ ते २५ दिवसांनी, निमगरव्या जातींची २३ ते २७ आणि गरव्या जातींची २५ ते ३० दिवसांनी करावी. एका चुडात २ ते ३ रोपे, तर संकरित जातींसाठी १ ते २ रोपे ठेवावीत. हळव्या जातींसाठी १५ x १५ सें.मी. आणि निमगरव्या/गरव्या जातींसाठी २० x १५ सें.मी. अंतर ठेवावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.