खरिपात शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
काटेवाडी, ता. १७ : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. पावसाने चांगली साथ दिल्याने जिल्ह्यात पेरण्यांनी वेग घेतला आहे. जिल्ह्यामध्ये सोयाबीन बाजरी व मका आधी पिकांच्या पेरण्या सर्वात जास्त झाले आहेत. सोयाबीन व बाजरीच्या सरासरी क्षेत्रापैकी ८५ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तर मका पिकाच्या सरासरीच्या ८७ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. खरिपाच्या एकूण सरासरी क्षेत्रापैकी १ लाख २४ हजार ७२९ हेक्टर म्हणजे ६२ टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.
जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या पेरण्या जुन्नर तालुक्यात सर्वाधिक झाल्या असून, १२ हजार ४२० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. त्या खालोखाल खेड व शिरूर मध्ये अनुक्रमे ९ हजार ७५४ व ४ हजार ३१७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरले गेले आहे. तसेच भोर आंबेगाव पुरंदर बारामती या ठिकाणी देखील सोयाबीन पेरले गेले आहे. तर बाजरी पिकाच्या सर्वाधिक पेरण्या शिरूर तालुक्यात झाल्या असून येथे १० हजार ८११ हेक्टरवर बाजरी पेरली गेली आहे. त्या खालोखाल पुरंदर व बारामती मध्ये बाजरीचा पेरा वाढला आहे. पुरंदर मध्ये ९ हजार ५७० तर बारामती मध्ये ५ हजार ६५० हेक्टरवर बाजरी पेरली गेली आहे. मका पिकामध्ये इंदापूर तालुक्याने आघाडी घेतली असून इंदापूर तालुक्यात ९ हजार ८१५ हेक्टर क्षेत्रावर मका पेरली गेली आहे. त्या खालोखाल शिरूर बारामती पुरंदर आदी तालुक्यांमध्ये देखील मक्याच्या क्षेत्रात वाढ आहे.
जिल्ह्यामध्ये, तृणधान्यांमध्ये खरीप ज्वारी, बाजरी मका, रागी, भात आदी पिकांच्या पेरण्या सुरू आहेत. एकूण तृणधान्याच्या ६९ हजार २१२ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. तर कडधान्यांमध्ये तूर, मूग, उडीद आदींच्या पेरण्या सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कडधान्याच्या १४ हजार ५४८ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. तर गळीत धान्य मध्ये भुईमूग, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारळे आदी पिकांच्या एकूण ३९ हजार ३१० हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. कापसाने देखील यंदा जिल्ह्यात १ हजार १२२ हेक्टर सरासरीच्या १४८ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाले आहे. यंदा जिल्हा कापसाच्या १ हजार ६५९ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये दौंड व बारामती तालुक्यात सर्वाधिक कापसाच्या पेरण्या झाल्या आहेत. तेलबियामध्ये सोयाबीनच्या खालोखाल भुईमुगाच्या पेरण्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक झाल्या आहेत.
जिल्ह्यातील पीकनिहाय पेरलेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)
बाजरी : ३३,१०६
रागी : ६१९
मका : २२,९८३
तूर : ७१४
मूग : ८,७९९
उडीद : १,२६१
भुईमूग : ४,९९८
सूर्यफूल : २७०
सोयाबीन : ३४,०३२
कापूस : १,६५९
समाधानकारक पावसामुळे यंदा खरिपाच्या पेरण्या वेगात सुरू आहेत. कृषी विभाग देखील वेगवेगळ्या पिकांबाबत वारंवार मार्गदर्शन पण माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहे. शेतकऱ्यांनी त्या माहितीचा उपयोग आपल्या उत्पादन वाढीसाठी करावा.
- संजय काचोळे, जिल्हा कृषी अधीक्षक पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.