ट्रायकोडर्मा बुरशी शेतकऱ्यांसाठी रोगनियंत्रक
काटेवाडी, ता. २०: ट्रायकोडर्मा बुरशी ही एक शेतकऱ्यांची नैसर्गिक मित्र बुरशी आहे. ही बुरशी जमिनीतील हानिकारक बुरशी आणि सूक्ष्मजंतूंना नष्ट करते, पिकांना पोषक द्रव्ये पुरवते आणि रासायनिक बुरशीनाशकांवरील अवलंबन कमी करते. ज्यामुळे शाश्वत शेतीला प्रोत्साहन मिळते, तसेच शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो.
ट्रायकोडर्मा ही मातीतील सेंद्रिय अवशेषांवर वाढणारी परोपजीवी बुरशी आहे. जी पिकांच्या मुळांजवळ संरक्षणात्मक कवच तयार करते. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या संशोधनानुसार, ट्रायकोडर्मा व्हिरीडी, हारजिएनम आणि व्हेरेन्स या तीन प्रमुख प्रजाती रोगकारक बुरशींशी स्पर्धा करतात किंवा त्यांना नष्ट करतात. राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर येथील वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. डी. जी. हिंगोले यांच्या मते, ‘‘पावसाळ्यात पेरणीनंतर ८ ते १० दिवस पावसात खंड पडल्यास हानिकारक बुरशींची वाढ होते, ज्यामुळे सोयाबीन, गहू, तूर, कापूस यांसारख्या पिकांचे नुकसान होते. ट्रायकोडर्मा ही बुरशी रोगकारक बुरशींपेक्षा अधिक वेगाने वाढते आणि सेकंडरी मेटाबोलाईट्स व एन्झाइम्सद्वारे त्यांना नष्ट करते.’’
जमिनीतून पसरणाऱ्या बुरशी आणि रोगांमुळे पीक कोणत्याही अवस्थेतील असले तरी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. ट्रायकोडर्मा ही जमिनीत असणारी एक पिकांसाठी फायदेशीर बुरशी आहे. ही बुरशी नैसर्गिकरीत्या जमिनीमध्ये असते. रासायनिक विविध प्रकारची खते व औषधे यामुळे ट्रायकोडर्मा बुरशीचा जमिनीमध्ये संचार कमी झाला आहे. त्यामुळे हानिकारक बुरशींची संख्या वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नैसर्गिक उपाय म्हणून ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर पिकांवरील रोगांसाठी करावा.
- डॉ. डी. जी. हिंगोले, वनस्पती रोग शास्त्रज्ञ, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजी नगर
फायदे आणि उपयोग
रोग नियंत्रण: ट्रायकोडर्मा हानिकारक बुरशी आणि सूक्ष्मकृमींवर परजीवी म्हणून कार्य करते, ज्यामुळे मर रोग आणि मुळे सडणे यांसारखे रोग नियंत्रित होतात.
पोषक द्रव्यांचा पुरवठा: पिकांना झिंक आणि इतर सूक्ष्म पोषक द्रव्ये मिळविण्यास मदत करते.
ताण सहनशीलता: पिकांमध्ये जैविक आणि अजैविक ताण सहन करण्याची क्षमता वाढवते.
खर्चात बचत: रासायनिक बुरशीनाशकांऐवजी पर्यावरणपूरक ट्रायकोडर्माचा वापर शेतकऱ्यांचा खर्च कमी करतो.
वापरण्याच्या पद्धती
बीजप्रक्रिया: १० किलो बियाण्यासाठी १०० मिली ट्रायकोडर्मा मिसळावे.
कंदप्रक्रिया: २०० मिली ट्रायकोडर्मा १० लिटर पाण्यात मिसळून कंद ३० ते ६० मिनिटे भिजवावीत.
फवारणी: १०० मिली ट्रायकोडर्मा १० लिटर पाण्यात मिसळून पिकांवर फवारणी करावी.
आळवणी: २०० मिली द्रावण पिकांच्या मुळांजवळ आळवावे.
माती मिश्रण: ५ लिटर ट्रायकोडर्मा २०० ते २५० किलो कुजलेल्या शेणखतात मिसळून एकरी शेतात टाकावे.
खबरदारी
कोरड्या जमिनीत ट्रायकोडर्मा वापरू नये.
बीजप्रक्रिया केलेले बियाणे सूर्यप्रकाशात ठेवू नये.
ट्रायकोडर्मा वापरल्यानंतर ४ ते ५ दिवस रासायनिक औषधांचा वापर टाळावा.
रायझोबियम, अॅझाटोबॅक्टर यांसारख्या जीवाणूंसोबत ट्रायकोडर्माचा वापर करता येतो.