चालत्या बसमध्ये माथेफिरूचा सहप्रवाशावर कोयत्याने हल्ला
काटेवाडी, ता. १ ः काटेवाडी (ता. बारामती) येथे बारामती- इंदापूर एसटी बसमध्ये एका माथेफिरूने सहप्रवाशावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. १) सकाळी १० च्या सुमारास घडली. या हल्ल्यात एक प्रवासी जखमी झाला असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
बारामती आगाराची बस (क्र. एमएच १४ बीटी ३५०६) सकाळी पावणेदहा वाजता बारामतीहून इंदापूरच्या दिशेने निघाली होती. या बसमध्ये सुमारे ६० प्रवासी प्रवास करत होते. आरोपी अविनाश सगर (वय २२, रा. लातूर), जो बसच्या शेवटच्या बाकावर बसला होता, त्याने समोरच्या बाकावर बसलेल्या पवन अनिल गायकवाड याच्यावर अचानक कोयत्याने वार केले. या हल्ल्यात पवनच्या चेहऱ्याला आणि डाव्या हाताच्या कोपऱ्याला जखमा झाल्या. हल्ल्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी आरडाओरड केली आणि चालकाने तातडीने बस थांबवली.
हल्ल्यानंतर पवन बसमधून उतरून पळून गेला, तर अविनाशने स्वत:च्या गळ्याला कोयता लावून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. चालकाने तातडीने पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.
अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमुळे बसमधील एक महिला प्रवासी धक्क्याने बेशुद्ध पडली. तिच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. आरोपी आणि जखमी व्यक्तीची कोणतीही पूर्व ओळख नव्हती. तसेच, दोघांमध्ये पूर्ववैमनस्य नव्हते. आरोपी अविनाश हा मागील तीन महिन्यांपासून बारामती येथील नातेवाइकांकडे राहत आहे. फरशी बसवणे व प्लबिंगचे काम करत आहे. तो वैफल्यग्रस्त आणि मानसिक तणावाखाली असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे मानसोपचार तज्ज्ञांकडे पाठवले जाणार आहे. बारामती तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होणार आहे.