वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव सिन्हा यांचे मत : वाकी येथील सिल्कबेरी चाँकी केंद्राला भेट

वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव सिन्हा यांचे मत : वाकी येथील सिल्कबेरी चाँकी केंद्राला भेट

Published on

रविकिरण सासवडे : सकाळ वृत्तसेवा
काटेवाडी, ता. २ : गाव पातळीवर रेशीम शेतीला सक्षम करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी ‘रेशीम ग्राम’ संकल्पना प्रत्यक्षात येत आहे. रेशीम ग्राम संकल्पनेच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळेल. तुती लागवडीपासून रेशीम वस्त्र निर्मितीपर्यंतची संपूर्ण साखळी गावातच विकसित करून ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता रेशीम उद्योगात आहे, असे मत वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव अन्शु सिन्हा यांनी व्यक्त केले आहे.

वाकी (ता. खेड) येथील सिल्कबेरी चाँकी केंद्राला नुकतीच सिन्हा यांनी भेट दिली. यावेळी त्या म्हणाल्या की, रेशीम ग्राम संकल्पना गावांना स्वयंपूर्ण रेशीम उद्योग केंद्र बनवण्यावर केंद्रित आहे. यात तुती रोप निर्मिती, कोश उत्पादन, धागा निर्मिती, रंगकाम आणि मुलायम रेशीम वस्त्रांचे उत्पादन गावातच होईल. याशिवाय, प्रशिक्षण केंद्र, औषधे व साहित्य विक्री केंद्र आणि पूरक व्यवसाय उभारले जाणार आहेत. ही संकल्पना नवीन शेतकरी आणि उद्योजकांना रेशीम शेतीत उतरण्यास प्रोत्साहन देईल. सध्या रेशीम शेती मुख्यत्वे तुती लागवड आणि कोश उत्पादनापुरती मर्यादित आहे, परंतु रेशीम ग्राममुळे उत्पादन, प्रक्रिया आणि विक्री व्यवस्था एकाच गावात एकत्र येईल.

दरम्यान, अन्शु सिन्हा यांना केंद्राचे चालक विजय गारगोटे यांनी रेशीम शेतीच्या कामकाजाची माहिती दिली. महाराष्ट्रात रेशीम शेतीला अनुकूल हवामान आणि जमीन उपलब्ध आहे. पुणे, नगर, सोलापूरसारख्या जिल्ह्यांमध्ये रेशीम शेतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.


रोजगार आणि आर्थिक उन्नती
रेशीम शेतीत एक एकर तुती लागवडीद्वारे किमान पाच जणांना वर्षभर रोजगार मिळू शकतो, असे सिन्हा यांनी सांगितले. यामुळे सुशिक्षित तरुणांचे शहराकडे होणारे स्थलांतर थांबेल आणि गावातच रोजगाराच्या संधी निर्माण होतील. रेशीम शेतीतून मिळणारे शाश्वत उत्पन्न शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देईल.

विक्री व्यवस्था आणि मूल्यवर्धन...
रेशीम ग्राममध्ये विक्री व्यवस्थेला विशेष महत्त्व आहे. सध्या रेशीम कोशांची विक्री स्थानिक बाजारपेठांमधून होते, परंतु गावातच धागा निर्मिती आणि वस्त्र उत्पादन झाल्यास शेतकरी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतील. शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) यात महत्त्वाची भूमिका बजावतील. गावात रंगकाम आणि वस्त्र निर्मितीच्या सुविधांमुळे रेशीम उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढेल.


रेशीम शेती आणि पूरक व्यवसायात उतरणाऱ्या शेतकरी व उद्योजकांना बँकांनी कर्जपुरवठा करावा. सरकारी योजना आणि बँकांचे सहकार्य रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक आहे. अधिकाधिक शेतकरी आणि उद्योजकांनी या उद्योगात सहभागी व्हावे.
- अन्शु सिन्हा, प्रधान सचिव, वस्त्रोद्योग विभागाच्या

01187

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com