खतांसोबत इतर उत्पादने सक्तीने
विक्री होत असल्यास तक्रार नोंदवा

खतांसोबत इतर उत्पादने सक्तीने विक्री होत असल्यास तक्रार नोंदवा

Published on

काटेवाडी, ता. ३ : खत कंपन्या शेतकऱ्यांना खतांसोबत इतर उत्पादने सक्तीने विकत घेण्यास भाग पाडत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढत आहे. याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना खतांसोबत कीटकनाशके, बियाणे, सूक्ष्म अन्नद्रव्ये किंवा इतर रासायनिक उत्पादने सक्तीने खरेदी करण्यास भाग पाडले जाते, अशा तक्रारी समोर येत आहेत. अनेकदा डीएपी किंवा युरियासारख्या खतांसोबत विशिष्ट कंपनीची कीटकनाशके, बुरशीनाशके किंवा बियाणे खरेदी करण्याचा दबाव शेतकऱ्यांवर टाकला जातो. उदाहरणार्थ, काही कृषी केंद्रे शेतकऱ्यांना गरज नसतानाही महागडी सूक्ष्म अन्नद्रव्ये किंवा विशिष्ट कंपन्यांची उत्पादने घेण्यास भाग पाडतात, ज्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो.
या सक्तीच्या खरेदीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण पडतो. एका एकरासाठी डीएपी खताची किंमत साधारणपणे १३५० रुपये प्रति ५० किलो आहे, तर सक्तीने खरेदी कराव्या लागणाऱ्या कीटकनाशक किंवा इतर उत्पादनांची किंमत ५०० ते २००० रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च २०- ३० टक्क्यांपर्यंत वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन कारावे लागत आहे. विशेषतः लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना हा आर्थिक बोजा असह्य ठरतो. याशिवाय, बाजारात डीएपीसारख्या खतांचा तुटवडा असताना नाईलाजाने शेतकऱ्यांना ही इतर उत्पादने विकत घ्यावी लागतात.

कृषी निवेष्ठांच्या लिंकिंग संबंधी शेतकऱ्यांच्या तक्रारीची सोडवणूक करण्यासाठी विभागातील पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ९२२५९५५९५५, अहिल्यानगर ७५८८५५६२७९ व सोलापूर ७२१९२८६९२८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर तक्रार करावी. शेतकऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची गुण नियंत्रण निरीक्षकांमार्फत शहानिशा करून तक्रारीत दोषी आढळून आलेल्या घाऊक किरकोळ विक्रेते यांच्याविरुद्ध खत नियंत्रण आदेश, १९८५ मधील तरतुदीनुसार निलंबन अथवा रद्दची कारवाई करण्यात येईल. याची नोंद घेऊन कृषी सेवा केंद्र चालकाने निविष्ठा विक्रीसाठी इतर निविष्ठांची सक्ती करू नये, असेही विभागीय कृषी सहसंचालक, पुणे यांनी सूचित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com