रेशीम कोष बाजारपेठेत एक कोटींची उलाढाल

रेशीम कोष बाजारपेठेत एक कोटींची उलाढाल

Published on

काटेवाडी, ता. ७ : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रेशीम कोष बाजारात २६ जून ते २५ जुलै या कालावधीत १ कोटी १६ लाख ८१ हजार ५८६ रुपयांची विक्रमी उलाढाल झाली आहे. २२२ शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या २३ टन रेशीम कोषांना प्रतिकिलो ५०० ते ५५० रुपये असा उच्चांकी बाजारभाव मिळाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले आहे. मागील महिन्यात १४ रिलर्सनी या खरेदी-विक्रीत सहभाग घेतला.

एप्रिल २०२२ पासून सुरू झालेल्या बारामती रेशीम कोष बाजारपेठेने आतापर्यंत तीन हजार ६३ शेतकऱ्यांना आपले २४७ टन ११४ किलो रेशीम कोष विक्रीची संधी उपलब्ध करून दिली आहे. या कालावधीत १२ कोटी ८ लाख ३२ हजार १३५ रुपयांची एकूण उलाढाल झाली आहे. पुणे, सातारा, अहिल्यानगर, बीड आणि छत्रपती संभाजी नगर यासह राज्यभरातील शेतकरी या बाजारात आपले कोष विक्रीसाठी आणत आहेत. येथील १४ रिलर्सनी या खरेदी-विक्रीत सहभाग घेतला, जे ई-नाम प्रणालीच्या वेबसाइटवर नोंदणीकृत आहेत.

ई-नाम प्रणालीद्वारे पारदर्शक व्यवहार
बारामती रेशीम बाजारात ई-नाम प्रणालीद्वारे ऑनलाइन लिलाव आणि पारदर्शक व्यवहार होतात. अचूक वजन आणि व्यवस्थित विक्री प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना इतर राज्यांतील बाजारांप्रमाणे चांगले दर मिळत आहेत. बाजार समितीचे सभापती विश्वास आटोळे आणि उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी शेतकऱ्यांना ग्रेडिंग आणि स्वच्छ केलेले रेशीम कोष बाजारात आणण्याचे आवाहन केले आहे. यामुळे कोषांना जास्त दर मिळण्यास मदत होते.

ऑनलाइन लिलाव, पारदर्शक व्यवहार आणि अचूक वजन यामुळे शेतकरी बारामती रेशीम बाजाराकडे आकर्षित होत आहेत. शासनाच्या पाठिंब्याने बारामती मुख्य यार्डमध्ये रेशीम कोष बाजारपेठ आणि कोषोत्तर प्रक्रिया व प्रशिक्षण इमारतीचे बांधकाम सुरू आहे. यामुळे भविष्यात शेतकरी आणि रिलर्स यांना सर्व आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून, बारामती रेशीम बाजार एक भव्य आणि अग्रगण्य बाजारपेठ बनणार आहे.
-अरविंद जगताप, सचिव, बारामती बाजार समिती

रेशीम बाजारासाठी विश्वासार्ह ठिकाण
बाजार समिती शेतकरी आणि रिलर्स यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत आहे. शेतकऱ्यांनी आपले रेशीम कोष ग्रेडिंग आणि स्वच्छ करून आणल्यास त्यांना जास्त दर मिळण्याची शक्यता आहे. या सुविधांमुळे आणि पारदर्शक व्यवहारांमुळे बारामती रेशीम बाजार शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण बनले आहे.

01211

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com