आपले सरकार सेवा केंद्रांचे मानधन रखडले
काटेवाडी, ता. ८ : आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत) प्रकल्पांतर्गत केंद्रचालकांचे मानधन रखडले आहे. पुणे जिल्ह्याची १८.४३ कोटी रुपये थकबाकी असून राज्याची ४२०.६१ कोटी रुपये आहे. यात २०२४-२५ ची ८४.७४ कोटी आणि २०२५-२६ साठीची ३३५.८७ कोटींची आगाऊ रक्कम आहे.
ग्रामविकास विभागाने १९ जानेवारी २०१९ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये आपले सरकार सेवा केंद्रांचे मानधन संगणक प्रणालीद्वारे अदा करण्याची कार्यपद्धती निश्चित केली आहे. यानुसार, प्रत्येक आर्थिक वर्षात प्रति केंद्र १३,४६३ रुपये आगाऊ स्वरूपात राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान, पुणे यांच्याकडे जमा करणे बंधनकारक आहे. या रकमेतून प्रकल्प अंमलबजावणी एजन्सीला प्राप्त होणाऱ्या इनव्हॉइसनुसार केंद्रचालकांचे मानधन थेट त्यांच्या खात्यावर जमा केले जाते. तसेच, इतर आनुषंगिक खर्चाचेही प्रदान केले जाते. मात्र, बुलडाणा, जळगाव, नाशिक, रायगड आणि वाशीम या पाच जिल्ह्यांशिवाय इतर सर्व जिल्हा परिषदांकडे २०२४-२५ ची थकबाकी आहे. यामुळे एप्रिल २०२५ पासून केंद्रचालकांचे मानधन अदा होऊ शकलेले नाही. सद्य:स्थितीत मार्च २०२५ अखेरचे मानधन अदा झाले असले, तरी अपुऱ्या निधीमुळे त्यानंतरच्या कालावधीचे मानधन रखडले आहे. याबाबत लोकप्रतिनिधी आणि केंद्रचालक संघटनांकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. तसेच, विधिमंडळातही हा मुद्दा वारंवार उपस्थित होत आहे. संचालक (पंचायतराज) यांनी ९ जुलै २०२५ रोजी सर्व जिल्हा परिषदांना निधी जमा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. याबाबत महाराष्ट्र शासनाचे उपसचिव प्रशांत पाटील यांनी ४ ऑगस्ट २०२५ रोजी पत्राद्वारे सर्व जिल्हा परिषदांना थकबाकी आणि चालू वर्षाची आगाऊ रक्कम तत्काळ जमा करण्याचे निर्देश दिले. तरीही, अनेक जिल्ह्यांकडून संपूर्ण रक्कम जमा झालेली नाही.
जिल्हानिहाय मागणीचे विवरणपत्र
ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना तत्काळ निधी जमा करण्याचे निर्देश दिले असून, याबाबत लवकरच आढावा बैठक घेतली जाणार आहे. संचालक पंचायतराज यांनी १ जुलै २०२५ रोजी उपसचिव, आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत प्रकल्प), ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांना थकबाकी आणि चालू वर्षाची मागणी रक्कम तत्काळ जमा करावी. यासाठी जिल्हानिहाय मागणीचे विवरणपत्रही पाठवले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.