किसान सन्मान निधीचे ९० कोटी जमा
काटेवाडी, ता. १८ : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ लाख ५१ हजार ८५० शेतकऱ्यांची RFT नोंदणी पूर्ण झाली आहे. यापैकी ४ लाख ४६ हजार ४२० शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये २० व्या हप्त्याअंतर्गत ९० कोटी ३७ लाख रुपये नुकतेच जमा करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील ५,४३० शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण न झाल्याने हा हप्ता मिळू शकलेला नाही. कृषी विभागाने शेतकऱ्यांना ई-केवायसी आणि इतर तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचे राज्यात नोंदणीकृत १ कोटी २३ लाख ९२ हजार लाभार्थी असून २० व्या हप्त्यासाठी ९६ लाख ५१ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयांप्रमाणे एकूण १ हजार ९३० कोटी २३ लाख रुपये रक्कम जमा करण्यात आले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू झाली असून, याअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला तीन समान हप्त्यांमध्ये ६,००० रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात.
महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गतही पात्र शेतकऱ्यांना अतिरिक्त लाभ मिळतो. या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे, फेरफार फेब्रुवारी २०१९ पूर्वीचा असणे आणि ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे.
हप्ते मिळत नसल्यास काय करावे?
जमिनीचे प्रमाणीकरण नसणे: महसूल विभागाशी संपर्क करून जमिनीचे प्रमाणीकरण (लँड सीडिंग) करावे.
ई-केवायसी अपूर्ण असणे: गावातील कृषी सहाय्यक किंवा सामुदायिक सुविधा केंद्र (CSC) मार्फत ई-केवायसी पूर्ण करावी.
बँक खाते आधारशी लिंक नसणे: बँकेत जाऊन खाते आधारशी लिंक करावे किंवा DBT-सक्षम खाते उघडावे.
बँक खाते बंद असणे: बँकेत चौकशी करून खाते पुन्हा सुरू करावे.
आधारमध्ये चुकीची माहिती: पीएम किसान पोर्टल किंवा CSC मार्फत आधार दुरुस्ती करावी.
इतर तांत्रिक अडचणी: बँक व्यवहार नाकारले गेल्यास बँकेत त्रुटी दूर करावी.
नोंदणीसाठी काय करावे
शेतकरी पीएम किसान पोर्टल (pmkisan.gov.in) वर स्वतः नोंदणी करू शकतात. याशिवाय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा सीएससी केंद्रांमार्फतही नोंदणी करता येते. नोंदणीसाठी भूमी अभिलेखांचे प्रमाणीकरण, आधार प्रमाणीकरण आणि ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे.
पुणे जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना २० व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही, त्यांनी तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा. तसेच आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी.
- संजय काचोळे, जिल्हा कृषी अधीक्षक पुणे
जिल्ह्यातील तालुकानिहाय लाभार्थी शेतकरी
तालुका.....................लाभार्थी शेतकरी
इंदापूर.........................५३,३६३
शिरूर..........................५२,५२१
बारामती........................५१,६२८
हवेली............................४९,००३
जुन्नर..,..........................४५,९९६
दौंड................................४३,१८८
आंबेगाव..........................३८,६४६
पुरंदर..............................३३,९८४
भोर.................................२६,११
मावळ..............................१७,९६२
मुळशी..............................१३,३५५
वेल्हे................................९,२८६