बारामतीत आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आंदोलन

बारामतीत आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Published on

काटेवाडी, ता. १९: बारामती तालुक्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत सुमारे ७० अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून (ता. १९) बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. नियमित सेवेत समायोजन, मानधनवाढ, विमा संरक्षण, आणि बदली धोरण यासह प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी किशोर माने यांना दिले.

यावेळी ‘समान काम, समान वेतन’ आणि ‘आम्हाला कायम करा’ अशा घोषणा देत त्यांनी शासनाच्या १४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी केली. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शासन निर्णयाची सव्वा वर्षांपासून अंमलबजावणी न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे तालुक्यातील लसीकरण सत्र, ऑनलाइन-ऑफलाइन अहवाल, आणि इतर सर्व कामे बंद ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती, महाराष्ट्र राज्य यांनी शासनाला कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्याचे आवाहन केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरू राहील, असे समितीने स्पष्ट केले आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समितीने सांगितले की, ८ आणि १० जुलै २०२५ रोजी आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत राज्यभरातील कर्मचारी काम बंद ठेवणार आहेत, असे समितीने जाहीर केले.


या आहेत प्रमुख मागण्या
१. १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचे १०० टक्के समायोजन आणि प्रत्येक वर्षी ३० टक्के प्रमाणे सार्वजनिक आरोग्य, ग्रामविकास, आणि वैद्यकीय शिक्षण विभागात समायोजन.
२. दरवर्षी आठ टक्के आणि २०२५-२६ मध्ये एकवेळची १० टक्के मानधनवाढ.
३. अपघाती मृत्यूसाठी ५० लाख, अपंगत्वासाठी २५ लाख, आणि औषधोपचारासाठी २ ते ५ लाखांचा विमा. १४ मार्च २०२४ नंतर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना ५० लाखांची तत्काळ मदत.
४. आयुष वैद्यकीय अधिकारी: बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, आणि जिल्हा रुग्णालयात समायोजन.

01263

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com