उजनीत पर्यावरण पुनर्स्थापना अन् शाश्वत मत्स्यविकास मोहीम
काटेवाडी, ता. १ : उजनी जलाशयात टिलापिया, आफ्रिकन कॅटफिश, सकरमाउथ कॅटफिश, इपोमिया आणि वॉटर हायसिंथ यासारख्या आक्रमक परदेशी प्रजातींमुळे पर्यावरणीय असमतोल निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) आणि सिप्ला फाउंडेशन यांच्या सहकार्याने पर्यावरण पुनर्स्थापना आणि शाश्वत मत्स्यविकासाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. सप्टेंबर २०२५ पासून परदेशी माशांचे उच्चाटन, स्थानिक मत्स्य बिज सोडण्यास प्रोत्साहन आणि मच्छिमारांना प्रशिक्षण देण्यावर भर दिला जाईल. जलसंपदा विभागाच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
भीमा नदीवरील उजनी जलाशय हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे मानवनिर्मित पाणथळ क्षेत्र आहे. हा जलाशय शेतीसाठी पाणी, जलविद्युत निर्मिती आणि पिण्याचे पाणी पुरवते. मध्य आशियाई पक्षी मार्गावरील स्थलांतरित पक्ष्यांसाठी हा जलाशय महत्त्वाचा थांबा आहे, म्हणूनच बीएनएचएस ने याला महत्त्वाचे पक्षी क्षेत्र (आयबीए) म्हणून घोषित केले आहे. स्थानिक मच्छिमार आणि पक्षी पर्यटनातून या परिसरातील समुदायांना उत्पन्न मिळते. बीएनएचएस आणि सिप्ला फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून, जलसंपदा विभागाच्या सहकार्याने, हवामान बदलाचा विचार करून हा प्रकल्प राबवला जात आहे. पुढील तीन वर्षे हा प्रकल्प उजनी जलाशयातील जटिल पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करेल आणि स्थानिक समुदायांसाठी शाश्वत भविष्य घडवेल. हवामान बदलाचा विचार करून राबवला जाणारा हा उपक्रम पर्यावरण आणि उपजीविका यांचा समतोल राखण्यासाठी देशभरात एक आदर्श ठरेल, असा विश्वास बीएनएचएस च्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
आक्रमक प्रजातींमुळे पर्यावरणाला धोका
उजनी जलाशयातील पर्यावरण आक्रमक परदेशी प्रजातींमुळे धोक्यात आहे. यात इपोमिया, वॉटर हायसिंथ आणि टायफा या वनस्पती आणि टिलापिया, आफ्रिकन कॅटफिश, अॅमेझॉनियन सकरमाउथ कॅटफिश आणि एशियाटिक प्लॅटमाउथ कॅटफिश यासारख्या माशांचा समावेश आहे. या प्रजाती स्थानिक वन्यजीवांशी स्पर्धा करतात, अन्नसाखळी विस्कळित करतात आणि मच्छिमारांचे आर्थिक नुकसान करतात. विशेषतः सकरमाउथ कॅटफिशला बाजारात मागणी नसल्याने मच्छिमारांचे नुकसान होते.
परदेशी माशांचे उच्चाटन अन् कार्यशाळा....
बीएनएचएस सप्टेंबर २०२५ च्या दुसऱ्या आठवड्यापासून परदेशी माशांचे उच्चाटन सुरू करणार आहे. स्थानिक मच्छिमारांचे गट तयार करून, वेगवेगळ्या जाळ्यांचा वापर करून प्रौढ मासे आणि पिल्लं पकडली जातील. यावेळी स्थानिक मासे जाळ्यात आल्यास त्यांना पुन्हा पाण्यात सोडले जाईल. मच्छिमारांना परदेशी आणि स्थानिक माशांमधील फरक समजण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन केले जाईल.
पर्यावरणीय पर्यटनाला चालना...
प्रकल्पात नवोदित पक्षी मार्गदर्शक आणि मासेमारी करणाऱ्या स्थानिकांना प्रशिक्षण देऊन त्यांना संरक्षण कार्यात सहभागी केले जाईल. यामुळे उजनी परिसरात पर्यावरणीय पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिकांना शाश्वत उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध होईल. हा उपक्रम पर्यावरण संरक्षणासह स्थानिक व्यवसायिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करेल.
प्रकल्प स्थानिक माशांच्या लागवडीला प्रोत्साहन देतो. प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात स्थानिक मत्स्यप्रजाती जलाशयात सोडल्या जातील, ज्यामुळे जैवविविधता टिकून राहील. मच्छिमारांना शाश्वत मच्छिमारी तंत्रांचे प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरून त्यांचे उत्पन्न टिकून राहील आणि पर्यावरणाचे रक्षण होईल. “परदेशी प्रजातींचे उच्चाटन आणि स्थानिक प्रजातींचे पुनर्वसन यामुळे उजनीचे पर्यावरण संतुलित होईल.
- उन्मेष कटवटे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी
01324
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.