खरेदी दर वाढूनही खर्चाचे जुळेना गणित

खरेदी दर वाढूनही खर्चाचे जुळेना गणित

Published on

काटेवाडी, ता. ३ : दूध संघांनी गाईच्या दुधाच्या खरेदी दरात पुन्हा एक रुपयाची वाढ केली आहे. या निर्णयामुळे एक सप्टेंबरपासून लागू झालेल्या प्रतिलिटर दर ३५ रुपयांवर पोचला. ऑगस्ट महिन्यात यापूर्वी दोनदा प्रत्येकी एक रुपयाने दरवाढ झाली होती. मात्र, उत्पादक शेतकऱ्यांना ही वाढ अपुरी वाटते. प्रतिलिटर दूध उत्पादनाचा एकूण खर्च सध्या प्रतिलिटर सुमारे ४० रुपयांपर्यंत जाऊन ठेपला आहे. पशुखाद्य, चारा, औषधे आणि इतर खर्चांत सातत्याने होणारी वाढ यामुळे नफ्याचे गणित जुळत नसल्याने उत्पादकांमध्ये नाराजी आहे.

सामान्य शेतकऱ्याकडे ५ ते १० जनावरे असल्यास प्रतिलिटर दुधासाठी पशुखाद्यावर सरासरी १५ ते २० रुपये खर्च होतो. चारा आणि हिरव्या वैरणीवर ५ ते ७ रुपये, औषधे व लसीकरणावर ४ ते ५ रुपये, तर मजुरी, वीज आणि पाणी यांसारख्या बाबींवर ५ ते ७ रुपये इतका अतिरिक्त भार पडतो. या सर्वांचा एकत्रित विचार केल्यास खर्च ३५ ते ४० रुपयांपर्यंत जातो. अशा स्थितीत ३५ रुपयांचा खरेदी दर मिळत असल्यास नफा तर दूरच, कधीकधी तोटाही सहन करावा लागतो. गेल्या काही वर्षांत दुधाच्या दरात फारशी प्रगती झालेली नाही. २०२१-२२ या वर्षात दुधाचे दर ३८ ते ४० रुपये प्रतिलिटरपर्यंत गेले होते. मात्र, त्यानंतर आजपर्यंत ते पूर्वीच्या उच्चांकापर्यंत पोहोचलेले नाहीत. दुसरीकडे, उत्पादन खर्चातील घटकांचे दर मात्र सतत वाढले आहेत. गेल्या महिन्यात बटर आणि दूध पावडरच्या किमती उंचावल्या. त्यात गौरी-गणेशोत्सवासह आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघांनी दरवाढ केली असली तरी ती पुरेशी नसल्याचे उत्पादकांचे मत आहे.


दुधाचे प्रतिलिटर दर वाढवले असले तरी इतर उत्पादन खर्च कमी होत नाही. उलट दुधाचे दर वाढवले की पशुखाद्याचे दर वाढवले जातात. त्यामुळे दर वाढले तरी उत्पादन खर्चात वाढ होत असल्याने शेतकऱ्याची परिस्थिती जैसे थे राहते. केवळ दर वाढवले म्हणून स्वतःचे कौतुक करून घेण्यातच या संस्था मश्गूल आहेत.
- ओंकार गायकवाड, दूध उत्पादक, वालचंदनगर (ता. इंदापूर)


गेल्या पाच वर्षांतील दुधाचे सरासरी
खरेदी दर (प्रतिलिटर, रुपयांत)
२०२०-२१..............३० ते ३२
२०२१-२२..............३८ ते ४०
२०२२-२३..............३४ ते ३६
२०२३-२४..............३२ ते ३४
२०२४-२५ (सध्या)..............३४ ते ३५


गेल्या पाच वर्षांतील पशुखाद्याचे
सरासरी दर (प्रति क्विंटल, रुपये)
२०२०-२१..............१५०० ते १८००
२०२१-२२..............१८०० ते २०००
२०२२-२३..............२००० ते २२००
२०२३-२४..............२२०० ते २५००
२०२४-२५ (सध्या)..............२५०० ते ३०००


गेल्या पाच वर्षांतील चाऱ्याचे सरासरी दर (सुका चारा प्रतिक्विंटल, रुपये; हिरवा चारा प्रतिक्विंटल, रुपये)
२०२०-२१..............सुका ३०० ते ४००; हिरवा..............१०० ते १५०
२०२१-२२..............सुका ४०० ते ५००; हिरवा..............१५० ते २००
२०२२-२३..............सुका ५०० ते ६००; हिरवा..............२०० ते २५०
२०२३-२४..............सुका ५०० ते ७०० ;

हिरवा..............२०० ते ३००
२०२४-२५ (सध्या)..............सुका ६०० ते ८००; हिरवा..............२५० ते ३५०


गेल्या पाच वर्षांतील औषध आणि उपचार खर्च (प्रतिजनावर प्रतिवर्ष, रुपये)
२०२०-२१..............२००० ते २५००
२०२१-२२..............२२०० ते २८००
२०२२-२३..............२५०० ते ३२००
२०२३-२४..............२८०० ते ३५००
२०२४-२५ (सध्या)..............३००० ते ४०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com