धरमपाजीच्या माणुसकीची हळवी आठवण
काटेवाडी, ता. २५ : सुपरस्टार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने सिनेसृष्टीसोबतच त्यांच्या वैयक्तिक नात्याच्या वर्तुळातही मोठी पोकळी निर्माण झाली. बारामतीत निवृत्तीनंतर राहणारे त्यांचे जिवलग मित्र सूर्यकांत बनसोडे हे या दुःखाने हादरले. लोणावळा पोलिस ठाण्यात सेवा करत असताना सुमारे दोन दशकांच्या कालावधीत विकसित झालेली मैत्री आज त्यांना असह्य विरह देऊन गेली.
सूर्यकांत बनसोडे १९९७ मध्ये पुणे ग्रामीण पोलिस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची लोणावळा येथे नियुक्ती झाली. याच हद्दीत धर्मेंद्र यांचे फार्महाऊस असल्याने दोघांची वारंवार भेट होत असे. त्या गाठीभेटींमधून निर्माण झालेली मैत्री हळूहळू कौटुंबिक नात्यात बदलली. ‘‘घरी गेलो की धर्मेंद्र मला मिठी मारून आपुलकीने विचारपूस करायचे. कार्यक्रम असला की हक्काने बोलवायचो आणि ते न चुकता यायचे,’’ असे बनसोडे सांगतात. २००० साली मुलाच्या वाढदिवशी धर्मेंद्र यांनी हातावर ठेवलेले पाच हजार रुपये त्यांना आजही विसरता येत नाहीत. ‘‘नकार दिल्यावरही ‘त्याला काही द्यायलाच हवं’ म्हणत त्यांनी पैसे खिशात कोंबले. इतका मोठा स्टार, पण अहंकाराचा लवलेशही नाही,’’ अशी आठवण ते भावुक होऊन सांगतात.
बाजरीची शिळी भाकरी अन् चहा
धर्मेंद्र यांना सकाळी नाष्ट्यामध्ये बाजरीची शिळी भाकरी आणि चहा फार आवडायचा. तसेच मटणाबरोबर बाजरीची भाकरी असा डबा घरून सूर्यकांत बनसोडे आवर्जून घेऊन जायचे. ‘‘त्यांना आपला घरचा डबा असा आवडीने खाताना पाहिले की आम्हालाही आनंद व्हायचा. त्या आठवणी आज डोळ्यांसमोर येतात आणि गहिवरून येतं,’’ असे सूर्यकांत बनसोडे सांगतात.
1545
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

